डोंबिवली : महायुतीने केलेले काम आणि केंद्र, राज्य सरकारच्या योजनांचा मिळालेला लाभ यामुळे विदर्भ आणि मराठवाडयात लोकांनी भर उन्हात बाहेर पडून मतदान केले. असेच वातावरण राज्याच्या इतर भागात आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज्यात महायुतीची लाट आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना केला.

देशाचा चौफेर विकास, प्रगती साध्य करायची असेल तर आपल्याला आता नेता त्या तोडीचा निवडायला हवा. विकास आणि बलवान नेता या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर आताची लोकसभा निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. विदर्भ, मराठवाडयात रणरणते ऊन असतानाही लोकांनी भर उन्हात बाहेर पडून मतदान केले.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या मालमत्तेत १३ कोटींनी वाढ

श्रीकांत शिंदे यांचे कौतुक

खासदार श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेला जनसमुदाय पाहता, नागरिकांनी खासदार शिंदे यांच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुत्र खासदार शिंदे यांचे कौतुक केले. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून खासदार शिंदे यांचा उल्लेख व्हायचा. गेल्या दहा वर्षांत खासदार शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे करून स्वत:ची ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.