डोंबिवली : येथील ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पूर्व भागात पोहच रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून राडारोड्याचे ढीग पडले आहेत. हे ढीग पालिकेकडून उचलले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आणि स. वा. जोशी शाळेसमोरील भागात हा राडारोडा पडला असून तो उचलण्याची मागणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंंबिवली पालिकेने धूळ नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गृहप्रकल्पांच्या ठिकाणी विकासकांना धूळ नियंत्रणासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली येथील उड्डाण पुलाच्या कोपऱ्यावर स. वा.जोशी शाळेच्या प्रवेशव्दारावर अनेक दिवसांपासून राडारोडा पडला आहे. तो पालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.

हेही वाचा : टीएमटीला जाहिरातींमधून मिळणार १२ कोटीचा महसुल; आठ वर्षानंतर निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद

या राडारोड्याने रस्त्याचा पाच ते सहा फुटाचा भाग व्यापला आहे. स. वा. जोशी शाळेत आपल्या मुलांना दुचाकी, चारचाकीवरून सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना राडारोड्याच्या ढिगामुळे तेथे वाहने उभी करणे शक्य होत नाही. वाहनांना वळण घेऊन पुलावरील मार्गिकेत जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत वारा सुटला की राडारोड्याची धूळ परिसरात पसरते. शाळेच्या आवारात खेळणाऱ्या मुलांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli heaps of debris on the approach road to thakurli bridge css