ठाणे : शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या प्रकाराला आळा बसावा यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून वाहनतळांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगरमधील भुखंडावर ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला असून त्याचे भुमीपुजन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्याने वाहनतळ इमारत उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. येत्या दिड वर्षात हे काम पुर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून रस्ते रुंदीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असले तरी शहरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने स्थानक परिसर तसेच शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ उभारणीची कामे हाती घेतली असून त्यापैकी काही वाहनतळांची कामे पुर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली झाली आहेत. त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील भुखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बहुमजली वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाला वन विभागाचा हिरवा कंदील; प्रकल्पाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगर येथे हा भुखंड आहे. याठिकाणी ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून यासंंबंधीच्या प्रस्तावास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २२ ऑगस्ट २०२३ च्या बैठकीत मान्यता दिली. यानंतर महामंडळाने सर्व कायदेशीर प्रक्रीया पार पाडल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बहुमजली वाहनतळ इमारतीचे भुमीपुजन करण्यात आले, अशी माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा :ठाणे : इन्स्टाग्रामवरून अमली पदार्थांची विक्री; ६० किलो गांजा, चरस तेल जप्त

असे असेल वाहनतळ

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुमजली वाहनतळ इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. तळ अधिक पाच मजली इमारत बांधण्यात येणार असून त्याच्या गच्चीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जाणार आहे. या कामासाठी ३१ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. ५८९ क्षमतेचे हे वाहनतळ असणार आहे. यामध्ये १४६ दुचाकी, १५० तीनचाकी, २५० चारचाकी आणि ४३ सायकल उभे करणे शक्य होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane midc to construct a parking of 589 vehicles capacity at wagle estate nehru nagar css
First published on: 10-02-2024 at 09:13 IST