उल्हासनगर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीची हाक दिली होती. माघ पौर्णिमेला होणाऱ्या आरतीला बुधवारी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र हे करत असताना दोन्ही गटांचे नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिपणी करण्यात आली. मलंगगडाला गद्दारांच्या पायापासून मुक्ती देण्याची वेळ आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर काही लोक फक्त देखावा करण्यासाठी इथे येतात, त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे, असा आरोप ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केला. ज्याप्रमाणे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली. त्याचप्रमाणे मलंगडाला ही लवकरच मुक्ती मिळेल असा दावा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केला. यामुळे मलंगडावर राजकारण तापल्याचे चित्र होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलंगगड हिंदू आणि मुस्लिम भाविकांसाठी आस्थेचे केंद्र आहे. आनंद दिघे यांनी ‘हिंदूंची वहिवाट हेच मलंग मुक्तीची पहाट’ अशी घोषणा दिली होती  त्यानंतर दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगगडावर शिवसेनेच्या वतीने आरती केली जाते. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर येथे दोन्ही गटांकडून हजेरी लावत आरती केली जाते. बुधवारी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आरतीसाठी हजेरी लावली. मात्र यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मलंगगडावर हजेरी लावली. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह दीपेश म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मलंग मुक्तीच्या फक्त बाता करतात पण या गद्दारांचे पाय या मलंग गडाला लागतात. त्यांच्यापासून मलंगगड मुक्त करण्याची वेळ आली आहे, अशी टीका दानवे यांनी केली. तर शिंदे गटाचे हिंदुत्व बेगडी आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व खरे आहे. निवडणुका झाल्यानंतर हिंदुत्वाची पुडी बांधून हे खिशात ठेवतात. आता मलंगगडावर हे फक्त देखावा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका दीपेश म्हात्रे यांनी केली.

तर यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मलंगगडाला लवकरच मुक्ती मिळेल असा दावा केला. पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाली. नुकताच दुर्गाडी येथील जागेचा प्रश्नही निकाली निघाला आहे. विशाळगडावरचे अतिक्रमणही काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लवकरच मलंगगडालाही मुक्ती मिळेल असा दावा मोरे यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena uddhav thackeray and eknath shinde factions disputed over malanggad amy