कल्याण : कल्याणसह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण सेवा देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा येथील क्रिएटिव्ह ग्रुप संचलित वैद्यकीय सुविधांनी अद्ययावत श्री महागणपती रुग्णालयातर्फे समृध्दी महामार्गावर दवाखाना आणि रुग्णवाहिकेची (कार्डियाक) सुविधा रविवारी सुरू करण्यात आली. एसबीआय फाऊंडेशन पुरस्कृत एसबीआय संजीवनी निरंतर सेवा रुग्णवाहिका आणि मेकशिफ्ट क्लिनीक प्रकल्प यांचे या दवाखाना आणि रुग्णवाहिकेसाठी महत्वाचे योगदान आहे. एसबीआय फाऊंडेशनच्या पुढाकारातून समृध्दी महामार्गावर सुरू होणारा हा पहिलाच अद्ययावत दवाखाना आहे. या दवाखान्यातील रुग्ण सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. या दवाखान्यात अनुभवी डाॅक्टर, परिचारिका, रुग्णसेवक यांसह वैद्यकीय उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती क्रिएटिव्ह ग्रुपचे अध्यक्ष आणि श्री महागणपती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बापट यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच समृध्दी महामार्गावर प्रत्येक टप्प्यांवर सुसज्ज रुग्णवाहिका सेवा, तात्काळ अपघात प्रतिसाद पथके तैनात ठेवली आहेत. या यंत्रणाही उत्तम काम या महामार्गावर करत आहेत. या यंत्रणेला एक सहाय्य म्हणून एसबीआय संजीवनी निरंतर रुग्णवाहिका (कार्डियाक रुग्णवाहिका) सेवा, दवाखाना श्री महागणपती रुग्णालयाच्या माध्यमातून सिन्नर येथील मेहकर मार्गबदल (इंटरचेज) ते छत्रपती संभाजीनगर येथील गोंदे मार्ग बदल भागात सक्रिय असणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बापट यांनी सांगितले.
मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटर लांबीच्या समृध्दी महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे, गावे, तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत. विना अडथळा, कमी वेळेत अंतर कापून होत असल्याने मुंबई, नागपूरसह या महामार्गालगतच्या शहर, गावांमध्ये राहणार नागरिक समृध्दी महामार्गावरील प्रवासाला पसंती देत आहेत. या महामार्गावरील वाहन भार वाढला आहे. या महामार्गावर प्रवास सुरू होताच गस्तीवरील पोलीस वाहन चालक, प्रवाशांना सुखरूप प्रवासाठीच्या योग्य सूचना देतात. तरीही या महामार्गावरून प्रवास करताना वाहनातील तांत्रिक बिघाड, काही वाहन चालक प्रमाणित वेगापेक्षा अधिकच्या वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते किंवा अन्य काही कारणांमुळे अपघात झाला तर अशा प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत घटनास्थळी व्हावी, या उद्देशातून हा दवाखाना, रग्णवाहिकेची सुविधा समृध्दी महामार्गावर सुरू करण्यात आली आहे, असे अध्यक्ष बापट यांनी सांगितले. मेहकर मार्ग येथे ही सुविधा उपलब्ध असेल. परिसरातील खेड्यांना यामाध्यमातून रुग्ण सेवा देण्यात येणार आहे.
या रुग्णवाहिका, दवाखान्याचे लोकापर्ण केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, एसबीआय फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक संजय प्रकाश यांच्या हस्ते मेहकर इंटरचेज रविवारी झाले. यावेळी एसबीआय कॅपचे ट्रस्टी अरबेंदु मुखोपाध्याय, मनुष्यबळ विकास प्रमुख अरविंद देव्हारे, कामगार आयुक्त नीलेश देठे, विशेष कार्य अधिकारी राजाराम चव्हाण, साहाय्यक व्यवस्थापक शुभम कुमार उपस्थित होते. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी या उपक्रमाला परवानगी दिल्याबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.