ठाणे : मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, भिक्षेकरींचा वावर वाढला आहे. भिक्षेकरी रेल्वे फलाटावर, स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडवून त्यांच्याकडे भिक्षा मागत असतात. तर, गर्दुल्ल्यांकडून स्थानक परिसरात झोपणे, अस्वच्छता पसरविले जात असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात कल्याण पलीकडील शहरांमधून कामानिमित्ताने अनेक प्रवासी येत असतात. तसेच अनेक प्रवासी ठाणे स्थानकातून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. दररोज ठाणे स्थानकातून लाखो प्रवाशांचा ये जा असते. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग, तसेच विविध खासगी कार्यालये आहेत. दररोज या भागांमध्ये विविध शहरातून रेल्वे मार्गे नोकरदार येत असतात. त्यामुळे ठाणे स्थानक परिसर नेहमीच प्रवाशांनी भरलेला असतो. ठाणे स्थानक पश्चिमेस प्रवाशांसाठी सॅटीस पुलाखाली रिक्षा थांबा देण्यात आला आहे. येथून नागरिक आपल्या इच्छितस्थळी प्रवास करतात. मात्र, या परिसरात भिक्षेकरी, गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असल्याचे निर्दशनास येत आहे. भिक्षेकरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांच्याकडे भिक्षेची मागणी करतात. अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी बसून हे भिक्षेकरी भिक्षा मागतात. किंवा प्रवाशांच्या मागे जात, हात लावत भिक्षा देण्यासाठी सांगतात. तसेच, स्थानक परिसरात गर्दुल्ले वाटेच झोपत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडून आसपासचा परिसर देखिल अस्वच्छ केला जातो. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

प्रतिक्रिया

ठाणे स्थानक पश्चिमेतून दररोज प्रवास करतो. या भागात अनेकदा भिक्षेकरी गर्दुल्ले दिसून येतात. भिक्षेकरी मागे येऊन, हात लावून भिक्षेची मागणी करित असतात. सारंग बोराडे, प्रवासी

प्रतिक्रिया

स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांकडून अस्वच्छता पसरवली जाते. तसेच महिल्यांच्या डब्ब्यात देखिल अनेकदा गर्दुल्ले जातात. यावर प्रशासनाने कारवाई करावी. तसेच कारवाईसाठी रेल्वे प्रवासी संघटनेकडून मदत केली जाईल.नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून भिक्षेकरी, गर्दुल्ल्यांवर वारंवार कायदेशीररित्या कारवाई केली जाते. तसेच लहान मुले भिक्षा मागताना दिसतात. त्यांच्या पालकांवर देखील कारवाई केली जाते. अर्चना दुसाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे रेल्वे लोहमार्ग