अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ आणि २० ऑक्टोबरला बी.पी. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वर्क महाविद्यालयाच्या सहकार्याने पहिले राज्यस्तरीय अपंग साहित्य व कला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अपंगामधील सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा संमेलनाचा मुख्य हेतू आहे.
पालकमंत्री शिवाजीराव मोघे या साहित्य संमेलनाचे स्वाध्यताध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रवींद्र जैन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्समधील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात होणाऱ्या संमेलनात विविध विषयांवरील पाच परिसंवाद, कथाकथन, प्रगट मुलाखत, कवी संमेलन, अंध व अपंग कलावंताची संगीत रजनी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील विजेत्या ५ हजार, ३ हजार, २ हजार आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. ‘अपंग कल्याण विविध योजना’ असा पोस्टर स्पर्धेचा विषय आहे. यातीन निवडक पोस्टर संमेलन स्थळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्मरणिका आणि अपंग वित्त विकास महामंडळाच्या महिती पत्राचे व विविध अपंग असलेल्या लेखकांचे काव्य आणि कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात येईल. संमेलनात राज्यभरातील एक ते दीड हजार प्रतिनिधी आणि साहित्यिक, कवी सहभागी होतील.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यात ब्रेललिपीचे ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. राज्याच्या अपंग वित्त विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी राहणार आहे. शिवाय शासनाच्या अपंगासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनेची माहिती देणारी दालने या ठिकाणी राहतील. संमेलनाच्या निमित्त ेक समिती स्थापन करण्यात आली असून त्यात समाज कल्याण विभागाचे आयुक्त आर.के. गायकवाड, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी. जिल्हाधिकारी सौरभ राव, अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव, प्राचार्य बबनराव तायवाडे यांचा समावेश आहे. अपंग वित्त व विकास महामडळ व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे हे निमंत्रण आहेत. संमेलन नियोजन समितीमध्ये डॉ. विजय आदमने, प्रणय पराते, गिरीश पांडव, प्राचार्य लक्ष्मीकांत तुळणकर, श्याम देऊळकर, अनिल ठाकरे इत्यादी समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First state disability literature meeting in october