हॉटेल, मॉल व्यावसायिकांचे धाबे दणाणले
मोठी हॉटेल, लग्न-समारंभासाठीची बडी सभागृह, आलिशान मॉल आणि रस्त्याच्या कडेलाच वाहन खरेदी-विक्रीचा बाजार यामुळे ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचे कंबरडे मोडणाऱ्या रस्ते अडवणुकीविरोधात ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते घोडबंदर मार्गावरील ओवळा चौकापर्यंतच्या तब्बल सात किलोमीटर अंतराच्या सेवा रस्त्याला यापुढे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सेवा मार्गाला खेटूनच आपले व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांनी येथील रस्त्याच्या कडेलाच आपल्या ग्राहकांसाठी बेकायदा वाहनतळे उभी केली आहेत. लुईसवाडी भागातील काही मंगल कार्यालयात एखादा समारंभ असला की सेवा रस्त्यावर दोन्हीकडील बाजूस बेकायदा वाहने उभी केली जातात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोरम आणि व्हिवियाना मॉलला लागून असलेल्या सेवा रस्त्यांवर होणारे बेकायदा पार्किंग येथील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरले आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आखलेल्या नव्या धोरणात आनंदनगर ते ओवळापर्यंतच्या सेवा रस्त्यावर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ठाणे शहराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांना लागून मोठय़ा प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गास लागूनच असलेल्या या सेवा रस्त्यांना शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. असे असले तरी येथे असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी येथील रस्त्यांना अक्षरश: गिळंकृत केल्याचे चित्र असून हे रस्ते म्हणजे वाहतूक कोंडीचे आगार बनले आहेत.
बडय़ा हॉटेलांची बेकायदा वाहनतळे
पूर्व द्रुतगती महामार्गावर तीनहात नाक्यापासून सुरू होणाऱ्या सेवा रस्त्यांना लागून काही बडी हॉटेलं उभी आहेत. यापैकी एखाद-दुसरा अपवाद सोडला तर बहुतांश हॉटेलांमध्ये पुरेशा प्रमाणात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. याच ठिकाणी काही मोठी मंगल कार्यालये असून तेथे आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभांसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या गाडय़ांची व्यवस्था पूर्व द्रुतगती महामार्गावरील कडेच्या रस्त्यावर केली जाते. यापैकी काही वाहने सेवा रस्त्यांवर उभी केली जातात.
या परिसरातील नागरी वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या या वाहनांवर कारवाई करताना पोलिसांनाही मर्यादा येऊ लागल्या आहेत. हॉटेल आणि मंगल कार्यालयांच्या बरोबरीने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभ्या राहिलेल्या कोरम आणि व्हिवियाना या दोन मॉलमुळे सेवा रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. या ठिकाणी असलेल्या वाहनतळांमध्ये वाहने उभी करण्याऐवजी रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
या प्रश्नांची उकल शोधण्याचा वारंवार प्रयत्न यापूर्वीही झाला असला तरी ठाणे महापालिकेने आता हा संपूर्ण सेवा रस्ता ‘नो पार्किंग’ झोन म्हणून निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदनगर भागातील इटरर्निटी मॉलपासून घोडबंदर मार्गावरील ओवळा चौकपर्यंतच्या संपूर्ण सेवा रस्त्यावर हा नियम लागू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने आखलेल्या नव्या पार्किंग धोरणात या नियमाचा अंतर्भाव करण्यात येणार असून सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगला आळा बसावा यासाठी खास मार्शल तैनात करण्याचा विचारही महापालिका स्तरावर सुरू आहे. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास हॉटेल, मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांवर गंडांतर येण्याची शक्यता असून सेवा रस्ते मात्र मोकळा श्वास घेऊ शकतील, असा दावा महापालिकेतील सूत्रांनी दिली. ठाण्याप्रमाणे कळवा चौक ते विटावा सब-वेपर्यंतच्या सेवा रस्त्यावरही अशाच प्रकारचा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीच्या धोरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
सेवा रस्त्यांवर नो पार्किंग
मोठी हॉटेल, लग्न-समारंभासाठीची बडी सभागृह, आलिशान मॉल आणि रस्त्याच्या कडेलाच वाहन खरेदी-विक्रीचा बाजार यामुळे ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचे कंबरडे मोडणाऱ्या रस्ते अडवणुकीविरोधात ठाणे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-11-2014 at 07:23 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No parking on service road