मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईला दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलेच झोडपले आहे. पहिल्या पावसाने मुंबईची पुरती दैना केली. अनेक ठिकाणी रुळांमध्ये पाणी साठल्यामुळे रेल्वे कोलमडली आणि शहरातील अनेक भागही जलमय झाले. हे चित्र मुंबईसाठी काही नवीन नाही. दरवर्षी मुंबईची हीच अवस्था होते. तुम्ही जर मुंबईकर असाल, तर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की दरवर्षी मुंबईची तुंबई का होते? तुमच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर या लेखात जाणून घ्या.. २६ जुलै २००५ हा मुंबईकरांसाठी अविस्मरणीय दिवस? मुंबईत जोरदार पाऊस सुरु झाला की मुंबईकरांना आठवतो तो दिवस जेव्हा मीठी नदीला महापूर आला होता. २६ जुलै २००५ रोजी मिठी नदीला आलेल्या महापुरामुळे जवळपास साडे आठशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या शिवाय मुंबईचे अब्जोवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या दिवसापर्यंत मुंबईकर मिठी नदीला 'मिठी नाला' समजत होते पण जेव्हा महापूर आला तेव्हा मुंबईकरांना साक्षात्कार झाला की 'मिठी' ही 'नदीच' आहे. हेही वाचा - २६ जुलै २००५ च्या महापुरातून जगातील दुसरे अनोखे नैसर्गिक आश्चर्य असलेल्या तुळशी तलावामुळे वाचले हजारो मुंबईकरांचे प्राण; जाणून घ्या यामागचे कारण मिठी नदीची महिकावती म्हणून ओळख चुकीची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका दाव्यानुसार 'मुंबईमध्ये पूर्वी महिकावती नावाची नदी अस्तित्वात होती, जी आता मिठी नदी नावाने ओळखली जाते.'' मुंबईमध्ये खरचं अशी महिकावती नावाची नदी होती का याचा शोध घेतल्यानंतर लक्षात येते की, 'मुंबईमध्ये महिकावती कधीही नावाची नदी अस्तित्वात नव्हती.' मिठी नदी केव्हा अस्तित्वात आली? याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, इंग्रजांच्या काळातील नकाशांमध्ये मिठी नदीचे अस्तित्व सापडत नाही. गेल्या दिडशे वर्षांमध्ये जे नकाशे अस्तित्वात आले त्यामध्ये मिठी नदीचे अस्तिव पाहायला मिळते. त्यामध्येही नकाशावर सुरुवातीला एक प्रवाहाचा भाग दिसतो नंतर कधीतरी त्याला मिठी नदी असे नाव देण्यात आल्याचे दिसते. मिठी नदीचा उगम कसा झाला? भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे १७० जुने नकाशे पाहिल्यानंतर असे लक्षात येते की,'त्यात मिठी नदीचे अस्तित्व सापडत नाही. कारण ज्या विहार तलावापासून मिठी नदी सुरु झाली तोच १८६० साली अस्तित्वात आला. विहार तलावातील सांडव्यातून (ओसंडून वाहणारे पाणी) वाहणाऱ्या पाण्यातून मिठी नदीचा उगम झाला. हे स्थान आहे पवईतील फिल्टर पाडा. येथे महापालिकेचा फिल्टरेशन प्लांट आहे जिथे पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. तेथून हा प्रवाह पुढे वाहतो आणि पवईच्या आजुबाजुच्या परिसरातून जातो. तिथे एक NITIE या महत्त्वाच्या संस्थेच्या बाजूने हा प्रवाह पुढे येतो. त्यांनतर मुंबईतील पाचपोली या प्राचिन गावाला वेढा घालून हा प्रवाह पुढे जातो आणि RAच्या परिसरात येतो. त्यानंतर वळासा घेऊन हा प्रवाह पुढच्या बाजूला येतो जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड आहे, त्याच्या खालून हा प्रवाह पुढे वाहतो जो पुढे वळण घेत मरोळ परिसरात येतो. मिठी नदी प्रवाह विहार तलावापासून सुरु होतो आणि माहिमच्या खाडीला जोडला जातो. हेही वाचा - कोणत्या ठिकाणी वीज पडण्याचा धोका सर्वाधिक? तुमच्या शहराचा आहे का समावेश, जाणून घ्या… २६ जुलै रोजी मुंबईत पूर का आला? मिठी नदीच्या संपूर्ण प्रवाहामध्ये सर्वांत जास्त व्यापला जाणारा परिसर म्हणजे मरोळ गाव आहे; जिथे औद्यगिक क्षेत्र आहे आणि पोलिस वसाहतदेखील आहे. मरोळ गाव आणि अंधेरी पूर्वचा परिसर पालथा घालून मिठी नदी सहार परिसरातून वाहते. या परिसरातील बराचसा भाग मुंबई विमानतळाने व्यापला आहे. येथूनच मिठी नदीच्या अडचणींना सुरुवात झाली. मुंबईतील विकासकामांमुळे मिठी नदीचे पात्र आकुंचित झाले आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीमध्ये मिठी नदी येत होती म्हणून तंत्रज्ञांनी धावपट्टी तशीच ठेवली आणि मिठी नदीचा प्रवाह वळसा घालून, बदलण्याचा प्रयत्न केला. नदीने कशी वळण घ्यायचे ते नदीच ठरवत असते. जर मानवाने निसर्गाच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि हा हस्तक्षेप निसर्गाने उधळून लावतो. हे २६ जुलै रोजी घडले जेव्हा मुंबई विमानतळाच्या धावपट्टीला वळसा घालून जाणारे मिठी नदीचे सर्व पाणी धावपट्टीवर आले आणि नंतर संपूर्ण विमानतळावर पसरले. २६-२७ जुलै रोजी विमानतळ बंद ठेवण्यात आले. त्यानंतर जी चौकशी झाली, त्यामध्ये मिठी नदीचा मार्ग वळवण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पुन्हा मिठी नदीचा मार्ग सुरळीत करण्यात आला. धावपट्टीच्या खालून जाणाऱ्या मिठी नदीचा प्रवाह पूर्ववत करण्यात आला; ज्यामुळे मिठी नदीचे पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरणे कमी झाले. https://www.youtube.com/watch?v=mqZa8O5C500&list=PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB&index=28 मुंबईत पूर येण्याचे मोठे कारण? विमानताळावरून कुर्लामार्गे वांद्रे-कुर्ला संकुलाकडे (बीकेसी) जाणारा मिठी नदीचा हा प्रवाह म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. येथे मिठी नदीचा संपूर्ण प्रवाह आकुंचन पावलेला आहे. म्हणून जेव्हा २६ जुलैला तुफान पाऊस झाला तेव्हा सर्वप्रथम जो पूर आला तो याच परिसरात आला. म्हणजे विमानतळ व एअर इंडियाच्या बाजूला असलेला परिसर आणि कुर्ला पश्चिमेचा परिसर हा पाण्याखाली गेला. माहुलच्या खाडीचा प्रवाह बंद झाला अन्... हा परिसर जेव्हा बीकेसीला पोहोचतो तेव्हा पुन्हा हा प्रवाह मोठा होतो. तो हळूहळू पुढे जात संपू्र्ण धारावीला वळसा घालून, माहीमच्या खाडीमध्ये समुद्राला येऊन मिळतो. कुर्ला ते बीकेसी या ठिकाणी मिठी नदीच्या प्रवाहामध्ये मोठी अडचण निर्माण झाली. पूर्वी हा मिठी नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने यायचा आणि त्यानंतर त्याचे दोन भाग व्हायचे. त्यातील एक भाग माहीमच्या खाडीच्या दिशेने जात असे आणि दुसरा भाग पूर्वी माहुलच्या खाडीमध्ये जाऊन मिसळत होता. पण, सध्या या प्रवाहाला वाहत पुढे जाण्यासाठी आपण जागाच ठेवलेली नाही. नकाशा पाहिला तर, मिठी नदीचा प्रवाह माहुलपासून कुर्ल्यापर्यंत येतो. पण हा प्रवाह आता बंद करण्यात आला आहे. एका बाजूला कल्पना टॉकिजपासून दुसऱ्या बाजूला नवसेना विहार रोडपर्यंत या प्रवाहाचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. समजा- जर हा भाग खुला असता, तर मुंबईत पूर आला नसता. अर्धे पाणी माहीम खाडीमध्ये आणि अर्धे पाणी माहुलच्या खाडीमध्ये जाऊन मिसळले असते.