Dinesh Karthik’s big claim : अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलच्या गेल्या १७ वर्षांतील फलंदाजीच्या वाढत्या पातळीकडे लक्ष वेधले आहे. त्याने शनिवारी सांगितले की, लवकरच या लीगमध्ये ३०० धावांचा टप्पाही पार केला जाईल. आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्या सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे, त्यांनी आरसीबीविरुद्ध ३ विकेट्स गमावून २८७ धावांची नोंद केली होती. त्याच वेळी, ३०० धावांची धावसंख्या टी-२० च्या इतिहासात फक्त एकदाच पार झाली आहे, जेव्हा नेपाळने गेल्या वर्षी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध तीन गडी गमावून ३१४ धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावा केल्या जातील –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिनेश कार्तिक म्हणाला, “मला वाटते की धावसंख्या सतत वाढत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जगभरातील या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या लीगपैकी आयपीएलच्या पहिल्या ३२ सामन्यांमध्ये २५० धावांची ही संख्या सर्वाधिक आहे. यावरून खेळाडू खूप बेधडक होत असल्याचे दिसून येते. खेळाडू सर्व सीमा ओलांडत आहेत. त्यामुळे ३०० धावांचा टप्पा लवकरच किंवा या वर्षीच आयपीएलमध्ये पार केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.”

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे संघांची फलंदाजी मजबूत झाली –

दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे संघांची फलंदाजी मजबूत झाली आहे. हा नियम तुमच्या फलंदाजीमध्ये खोली वाढवत आहे, ज्यामुळे गोलंदाजांवर खूप दबाव निर्माण होत आहे. दरम्यान अनेक युवा खेळाडू काही उत्तम शॉट्स खेळतानाही दिसत आहेत. या स्पर्धेतील गेल्या १७ वर्षांचा आढावा घेतला, तर फलंदाजीची पातळी किती अवास्तव उंचावत चालली आहे, हे लक्षात येईल.” अशात कार्तिकने पुन्हा भारताकडून खेळण्याचे स्वप्न सोडले नाही आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हेही वाचा – IPL 2024: हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी

दिनेश कार्तिक टी-२० विश्वचषकासाठी सज्ज –

युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत दिनेश कार्तिक ३९ वर्षांचा होईल. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचाही तो भाग होता. जी भारतीय संघासाठी त्याची शेवटची स्पर्धा होती. तेव्हापासून तो क्रिकेट तज्ञ बनला आणि समालोचनही करू लागला. आयपीएलच्या या मोसमात पुनरागमन करत, त्याने आपल्या फलंदाजीला एका नवीन स्तरावर नेले आहे आणि २०५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने तो शानदार फलंदाजी करत आहे. आरसीबीत विराट कोहली (३६१) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (२३२) यांच्यानंतर २२६ धावांसह तो संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.