Chest Pain & Heart Attack : छातीत दुखण्याचा थेट संबंध हृदयविकाराच्या झटक्याशी जोडला जातो. छातीत दुखण्याचं लक्षण जरी सौम्य वाटत असले तरी काही वेळा मेडिकल इमर्जन्सीचे कारण ठरू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का, छातीत दुखणे या लक्षणाचा संबंध हृदयविकाराच्या झटक्यांसह हृदयाशी संबंधित समस्यांशी जोड असला, तरी ही समस्या हृदयाद्वारे उद्भवलेली नसते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल यांनी छातीत दुखण्याची सामान्य कारणे आणि त्यावर उपचार कसे करावे, याविषयी इंडियन एक्स्प्रेसला खास माहिती सांगितली.

छातीत दुखण्याची सामान्य कारणे –

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१. हृदयविकाराशी संबंध नसलेली कारणे

छातीत दुखणे हे लक्षण प्रत्येकवेळी हृदयाशीच संबंधित नसते. इतर कारणांमुळेसुद्धा छातीत दुखू शकते.

गॅस्ट्रोइन्टेस्टीनल समस्या

अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ वाटल्याने छातीत दुखू शकते, ज्याला अनेकदा आपण हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण समजतो.

स्नायुशी संबंधित समस्या

छातीच्या स्नायूंमध्ये झालेली दुखापत किंवा ताण आल्याने छातीत कळ येणे किंवा छाती दुखणे, अस्वस्थता जाणवणे, अचानक श्वासोच्छ्वास वाढणे ही लक्षणे दिसून येतात.

एंन्झायटी आणि पॅनिक अटॅक

तणाव आल्याने छातीत दुखणे हे एंन्झायटी किंवा पॅनिक अटॅकचे लक्षण आहे. यामध्ये अचानक हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे आणि छातीत दाटून येणे इत्यादींचा समावेश असू शकतो.

२. हृदयाशी संबंधित कारणे

हृदयविकाराच्या स्थितीत छातीत दुखणे गंभीर असते आणि त्यासाठी लगेचच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यकता असते, असे डॉ. गोयल सांगतात.

अन्जायना (Angina):

जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा छातीत दुखते, या प्रकाराला अन्जायना म्हणतात. अनेकदा यामुळे शारीरिक हालचालींवर परिणाम होतो किंवा तणाव वाढतो आणि छातीत दाब निर्माण झाल्यासारखे वाटते.

हृदयविकाराचा झटका :

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत दाब निर्माण होणे किंवा छातीत दाटून येणे आणि अनेकदा हा दाब हात, पाठ, मान किंवा जबड्यात पसरण्याची शक्यता असते. इतर काही लक्षणे खालीलप्रमाणे –

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • घाम येणे
  • मळमळ वाटणे

वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?

छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. याबाबत सावधगिरी बाळगून डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. विशेषत: जेव्हा अचानक इतर धोकादायक लक्षणे दिसत असतील, असे डॉ. गोयल सांगतात.

खालील लक्षणे दिसून आली तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • मळमळ किंवा उलट्या होणे
  • चक्कर येणे
  • सतत जास्त वेळ छातीत दुखणे.
  • छातीतील वेदना शरीराच्या इतर भागास जसे की हात किंवा जबड्यामध्ये पसरत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

छातीत दुखणे कमी झाले तरी आरोग्याविषयी सतर्क राहण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is really chest pain always a symptom of a heart attack not all chest pains are heart attacks know the difference ndj