रवींद्र केसकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड खर्च कपातीचा नवा मानदंड रचला आहे. मागील वर्षीच्या हंगामात ऊसतोड खर्च कपातीत आंबेडकर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. ऊसतोड आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ ५४९ रूपये ८० पैसे एवढी खर्चकपात करण्यात आंबेडकर कारखान्याला यश आले आहे. सर्वात कमी खर्चकपात करणार्‍या राज्यातील पाच कारखान्यांपैकी धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकर आणि नॅचरल शुगर या दोन कारखान्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> “दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, त्यामुळे…”, मनसेची बळीराजासाठी सरकारकडे मागणी; म्हणाले…

राज्यात प्रचलित पध्दतीनुसार साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभी केली जाते. या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्यावतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतूक केली जाते. तोडणी आणि वाहतुकीपोटी आलेला खर्च ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांच्या एफआरपी म्हणजेच देय असलेल्या रकमेतून खर्च केला जातो. गतवर्षी खर्च करण्यात आलेल्या ऊसतोडणी व वाहतूक खर्च कपातीची माहिती राज्यातील शेतकर्‍यांना व्हावी, यासाठी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. राज्यातील सहकारी, खासगी कारखान्यांचे कारखानानिहाय खर्चकपातीची रक्कमच साखर आयुक्तांनी घोषित केली आहे. विविध शेतकरी संघटना या खर्चावरून सातत्याने आक्षेप व्यक्त करीत होते. त्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक महत्वाचे मानले जात आहे.

हेही वाचा >>> “ओबीसींमधल्या कुणबी समाजाने मन मोठं करून…”, अमोल मिटकरींचं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे वादाची शक्यता

राज्यात मागील वर्षीच्या हंगामात ऊसतोड आणि वाहतूक खर्चकपात करणार्‍या राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रिलायबल शुगर अ‍ॅन्ड डिस्टलरी पॉवर लिमिटेड यांनी शेतकर्‍यांच्या देय रकमेतून वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी एक हजार २१८ रूपये अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर प्रा. लि. ने एक हजार 146 रूपये, भंडारा येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजने एक हजार ८२ रूपये, नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर लिमिटेडने एक हजार ६१ रूपये तर छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर शुगर प्रा. लि. या कारखान्याने एक हजार ५५ रूपये इतकी प्रति मेट्रीक टन शेतकर्‍यांच्या एफआरपीमधून खर्चकपात केली आहे.

* सर्वात कमी ऊसतोडणी व वाहतूक खर्चकपात करणारे कारखाने

* धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना प्रतिटन ५४९.८० खर्चकपात

* अहदमनगर  जिल्ह्यातील  सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी सा. का. प्रतिटन  ६२१.२५ खर्चकपात

* कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६२६.५२ रुपये खर्चकपात

* धाराशिव जिल्ह्यातील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रतिटन ६३९.२२ रुपये खर्चकपात

* सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६५६.२८ रुपये खर्च कपात

साखर उतारा आणि एफआरपीतही प्रगती

मागील वर्षी १०.२५ टक्के उतार्‍यासाठी प्रतिटन तीन हजार ५० रूपये एफआरपी निर्धारित करण्यात आला होता. साजन शुगर या खासगी साखर कारखान्याचा सरासरी उतारा १०.०४ टक्के आणि एफआरपी दर दोन हजार ९८५.८५ रूपये आहे. त्यामध्ये प्रतिटन एक हजार १४६.९२ एवढी ऊसतोड व वाहतूक खर्च कपात करून शेतकर्‍यांना एक हजार ८३८.९३ रूपये मिळाले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.६१ टक्के आणि प्रतिटन एफआरपी दर तीन हजार १५९.८० आहे. त्यातून ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ ५४९.८० रूपये वजा करून शेतकर्‍यांना प्रतिटनास दोन हजार ६१० रूपये एवढा दर दिला आहे. – यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय पुणे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar factory tops in maharashtra for reduction in cutting cost of sugarcane zws