छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मधून भारतात परत आणली जाणार आहेत. यासाठी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वाघनखांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं आहेत, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. राऊतांच्या या विधानावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता ना शिवसेना आहे, ना वाघनखे आहेत, कारण सेना आणि वाघ दोन्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून हे टीकास्र सोडलं.
हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
संजय राऊतांच्या विधानावर भाष्य करताना केशव उपाध्ये पोस्टमध्ये म्हणाले, “मुळात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसेना राहिलीय. ना वाघनखे राहिलेत. कारण सेना आणि वाघ दोन्ही शिंदेंबरोबर गेले. राजकारण करायला शेकडो मुद्दे आहेत. पण वंदनीय शिवरायांच्या वाघनखांना राजकारणात बळजबरीने ओढून तुम्ही तुमची नीच मानसिकता दाखवून दिली.”
“सत्तेसाठीचं हपापलेपण राऊतांच्या डोक्यावर पार परिणाम करुन गेलं आहे. हेच खरं! सत्ता येते, जाते, पुन्हा येते. पण त्या सत्तेसाठी इतकेही बेफाम होऊ नये. जिथं प्रत्येकाचा माथा आपसूकच टेकतो, त्यावरुन राजकारण करु नये,” असंही केशव उपाध्ये म्हणाले.
हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
संजय राऊतांना पोस्टमध्ये टॅग करत केशव उपाध्ये म्हणाले, “वाघनखं जुलमी मुघलांना संपवण्यासाठी वापरली होती. स्वकीयांबरोबर धोका करून अहंकाराने बरबटलेल्यांनी स्वतःला शिवरायांची वाघनखं म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाही. औरंगजेबाची कबर सजवण्याऱ्या सरकारमध्ये तुम्ही होता. हिंदू साधूंची हत्या करणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही होता, हे विसरू नका.”
हेही वाचा- वाघनखं परत आणण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “ते छत्रपतींची वाघनखं आणायला गेलेत. याचा आम्हाला आनंद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं शिवसेना आहे. हे लक्षात ठेवा. गेल्या ५०-५५ वर्षांत या वाघनखांनी महाराष्ट्रावर येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा कोथळा काढला आहे.”