जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळणा-या पावसामुळे चिपळूण, खेड,  राजापूरसह संगमेश्वर शहर परिसरात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत  १७७ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. रत्नागिरी  जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे   चिपळूण शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने  महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू होती. बहादुर शेख नाका ते पाग नाकापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारातही पाणी साचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे शहरात पाणी भरण्याचे नवीन ठिकाण तयार होत आहेत की काय ? अशी येथील नागरिकांना भीती वाटू लागली आहे.  पाग नाका येथील रस्ता उंच करताना तेथे येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे आता महामार्गावरील पाणी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहत आहे. येथे गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे बुरूमतळी भागातील मध्यवर्ती बस स्थानक ते पोलीस ठाणे हा रस्ता रविवारी दुपारपर्यंत पाण्यात गेला होता. सकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना येथे दीड फूट पाणी साचले होते. त्या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे पोलीस ठाणे, अधिकारी व कर्मचारी निवासस्थान तसेच पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी साचले होते. येथील रस्ताही जलमय झाला होता. सुमारे दोन ते अडीच फूट पाणी रस्त्यावर आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.

हेही वाचा >>> सातारा : पश्चिम घाट क्षेत्रात तुफान पाऊस; कोयनेची जलआवक पाचपट वाढली

संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जि. प. रस्त्यावर पाणी भरलेले असल्याने सदरच्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. खेड शहर भागातील चिपळून नाका, तळ्याचे वाकन परिसर येथील १७७ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा

दापोली मंडणगड या रस्त्यावर पालगड पवारवाडी पुलावरून पाणी जात असल्याने छोट्या वाहनांना वहातुकीला बंदी केली आहे. मंडणगड तालुक्यातील भारज नदीला पूर आला असून चिंचगर मांदिवली पुलावरून पाणी जात आहे. या ठिकाण वाहतूक बंद करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील पालघर येथील ग्रामस्थ दीपक शंकर तांबुटकर भारजा नदीच्या पात्रात पडून वाहून गेले होते. त्यांना आपतकालीन पथकामार्फत वाचविण्यात यश आले. खेड येथील पुराची परिस्थिती बघता पुणे येथून एन. डी. आर. एफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा फटका  कोकण रेल्वेला देखील बसला आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दिवाणखवटी आणि व्हीनेरे दरम्यान  दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे. बाकी मार्गावरील वाहतूक सुरू असून माती, दगड दूर करण्यासाठी यंत्रणा कामगार घटनास्थळी पोहोचले आहेत. किमान दोन ते अडीच तासांनी हा मार्ग मोकळा होईल असे अपेक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलाडली आहे तर वाशिष्ठी नदी, कोंदवली आणि मुचकुंदी नदी  इशारा पातळीच्या वर वहात आहेत. जिल्ह्यात रविवारी १२२.६४ टक्के मिली मीटर तर दिवसभरात ११०३.७३ एवढा सरासरी पाऊस पडला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in ratnagiri district flood water enters in chiplun khed city zws