Ladki Bahin Yojana Last Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, ३१ ऑगस्ट रोजी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया संपणार होती. परंतु, यासंदर्भात आदिती तटकरे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत काय आहे? (When is Last Date of Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही तटकरे यांनी सांगितले.
बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी यावेळी केले.
अर्ज छाननी प्रक्रिया आजपासून सुरू होणार (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले.
© IE Online Media Services (P) Ltd