देशाची आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. देशभरातले जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झल्या आहेत. सत्ताधारी भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकजूट तयार करत आहेत. राज्यातही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर आव्हान निर्माण केलं आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. आगामी रणनीती, महाविकास आघाडीच्या सभा आणि जागावाटपाबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाकडून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह अनेक मोठे उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात असा निर्णय झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ठाकरे गट १६, राष्ट्रवादी १६ आणि काँग्रेस १६ जागा लढवेल असं बोललं जात आहे. परंतु याबद्दल तिन्ही पक्षांच्या कोणताही नेत्याने याबाबत पुष्टी केली नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला दंगलीबाबत आज (१६ मे) सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांना महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या फॉर्म्युलाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. लोकसभेला महाविकास आघाडीचा १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरलाय का? असा प्रश्न पटोले यांना विचारल्यावर पटोले म्हणाले, याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे. जागावाटपाचा मुद्दा अजून पुढे गेलेला नाही.

हे ही वाचा >> अकोल्यात ‘त्या’ रात्री काय घडलं? नाना पटोलेंनी सांगितला दंगलीचा संपूर्ण घटनाक्रम, गृहमंत्री फडणवीसांना म्हणाले…

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

दरम्यान, या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा काय फॉर्म्युला ठरवला आहे असा प्रश्न विचारला. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला काहीच माहिती नाही. त्या बैठकीत मी आंधळा, मुका आणि बहिरा होतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole on mahavikas aghadi seat sharing formula for lok sabha election 2024 asc