Amol Mitkari On Jayant Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज काही प्रमुख नेत्यांची भाषणं सभागृहात झाले. यावेळी सभागृहात एकमेकांना चिमटे आणि टोमणे लगावल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील हे भाषण करत असताना त्यांच्या भाषणातील एक चूक अजित पवारांनी सुधारली. त्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांकडे पाहत केलेल्या एका विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ‘आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’, असं जयंत पाटलांनी म्हटलं. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या विधानानंतर जयंत पाटील हे अजित पवारांच्या पक्षात जाणार का? याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

हेही वाचा : Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“आज विधानसभेच्या सभागृहात महत्वाची भाषणं झाली आहेत. त्यामध्ये जयंत पाटील यांच्या भाषणात ते अजित पवारांकडे पाहत एक वाक्य बोलले ते वाक्य मला फार भावलं. ‘आपल्या पक्षाचं (राष्ट्रवादी काँग्रेस) एक वाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय.’ दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियम आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत. पण थोडं वेट अँड वॉच करा, महाराष्ट्राला चांगली गुड न्यूच मिळेल”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

“मी देखील ट्विट केलं आहे की, आपल्या पक्षाचा नियम काय? योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे मागच्या काळात त्यांनी (जयंत पाटील) प्रयत्न केले होते. पण ती योग्य वेळ नव्हती. आता सरकार स्थापन झालंय, कदाचित आता योग्य वेळ असेल. मग राम कृष्ण हरी हा गजर बंद होऊन देवगिरीची दारे उघडी आहेत”, असं सूचक विधान अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलं.

‘ड्रायव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव’

“जयंत पाटील यांना आव्हान करेन एवढा मोठा नेता मी नाही. मात्र, त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढं घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यासारखा नेता प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. असा नेता भाजपालाही हवाहवासा वाटेल. ड्रायव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? ते देखील उत्तम चालक आहेत. वेळ पडली तर थेट स्टेअरिंग त्यांच्या हाती देऊ. आज त्यांनी (जयंत पाटील) सभागृहत केलेलं विधान महाराष्ट्राला फार काही सांगून जाणारं आहे. त्यांच्या विधानाचं कृतीत रूपांतर झालेलं दिसेल”, असं मोठं विधान अमोल मिटकरींनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group leader amol mitkari on jayant patil and ncp sharad pawar group ncp politics gkt