मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. आज सोमवारी विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांचीच पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी भाषणं केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात तुफान टोलेबाजी केली. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मिश्किल टिप्पणी करत टोला लगावला!
तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. त्यावर जयंत पाटील खोचक शब्दांत म्हणाले, “आज तिघांची भाषणं झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुखमंत्र्यांचं आहे की काय असं वाटायला लागलं. प्रदीर्घ असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं”.
अध्यक्षपदी निवड आणि सासऱ्यांचा आग्रह!
दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकरांनी मंत्री व्हायला हवं होतं असं विधान करताच देवेंद्र फडणीसांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “मी अध्यक्षांना खासगीत सांगायचो की परत संधी मिळाली तर मंत्री व्हा. पण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला त्या बाबतीत खोलात जायचं नाहीये”, असं जयंत पाटील म्हणताच समोर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसल्या बसल्याच “सासऱ्यांचा आग्रह होता की अध्यक्षच करायचं”, अशी टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर जयंत पाटील यांनीही चिमटा काढला. “सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला अलिकडच्या काळात चांगलंच कळायला लागलं आहे. पण सासऱ्यांच्या आग्रहामुळे नार्वेकरांना अध्यक्षपद मिळालं असं म्हणणं त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर पुन्हा एकदा सभागृहात हास्याची लकेर उमटली.
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष झाले, तेव्हाच सासरे-जावई दोन्ही सभागृहात अध्यक्ष झाल्याची चर्चा रंगली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी रामराजे नाईक निंबाळकर तिकीटवाटपाबाबत नाराज असल्याचं सांगितलं गेलं. यासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानांचीही मोठी चर्चा पाहायला मिळाली. जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीसांना लगावलेला टोला याचसंदर्भात असल्याचं बोललं जात आहे.