महाराष्ट्रात काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी भारतीय जनता पक्षावर त्यांनी हल्लाबोल केला. “वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

वरळीत आज फुटबॉलची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चिखलात फुटबॉल खेळणं याची एक वेगळी मजा असते. वरळीत राजकीय चिखल झाला आहे. मात्र. याला राजकीय रंग देण्याची गरज नाही. मी जेव्हा वरळीतून निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितलं होतं सर्वजण ही सीट पाहायला येतील. वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात. मी सर्वांचं स्वागत करतो. काही मोठ्या लोकांनी या ठिकाणी रोड शो करावा, अशी माझी विनंती आहे. त्यांनी जर रोड शो केला तर आम्हाला फायदा होतो. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

श्रीकांत शिंदेंचे प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीला लगावला होता. आता त्यांच्या या टिकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. श्रीकांत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केलं. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतं मिळवली. लोकांची दिशाभूल एकदा करतील. मात्र, वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल. आता पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीमधून उभ राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहा”, असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला.