Sanjay Raut vs Raj Thackeray: शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे राज ठाकरे नुकतेच कल्याण ग्रामीण येथील जाहीर सभेत म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या विधानाबाबत आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे जे बोलत आहेत, तीच बाब आम्ही दोन वर्षांपासून सांगत आहोत. शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण आहेत? त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे आज उचलत आहेत. राज ठाकरेंचा हल्ला मोदी-शाहांवर असायला हवा”, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत

संजय राऊत पुढे म्हणाले, “ज्याप्रकारे पोर्तुगीजांनी मुंबई आहेर म्हणून ब्रिटिशांना दिली होती. त्याचपद्धतीने मोदी-शाह या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहेर म्हणून शिंदेंना दिली. राज ठाकरेंनी यावर बोलायला पाहीजे. आम्हाला राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आज तुम्ही (राज ठाकरे) ज्यांचा प्रचार करत आहात, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी शिंदेंना दिली. त्याच भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, असे राज ठाकरेंना वाटते. यासारखे दुसरे पाप नाही आणि याबद्दल बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत.”

“शिवसेना कुणाची प्रॉपर्टी हे ठरविण्यासाठी राज ठाकरेंना आम्ही लवाद म्हणून नेमलेले नाही. शिवसेना शिंदेंची प्रॉपर्टी नाही, तशी ती मोदी-शाहांचीही नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती सुपूर्द केली होती. शरद पवार हयात असताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या हाती देण्यात आला. राज ठाकरे हा मूळ मुद्दा बाजूला ठेवून बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री करायचा आहे”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

हे वाचा >> Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाचे नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनीही पक्षाचे नाव घेतले, निशाणी घेतली. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे आणि नाही उद्धव ठाकरेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसे हात लावता? तुम्हाला काय ते आमदार फोडाफोडीचे राजकारण करा”, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले.

ते पुढे म्हणाले, “माझे कितीही मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचे अपत्य आहे. ते अजित पवारांचं अपत्य नाही. महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी? पक्ष पळवतात, निशाणीच्या निशाणी पळवतात. माणसं पळवली जातात. ज्या महाराष्ट्राकडे सुस्कृंत महाराष्ट्र म्हणून पाहिले जायचे, देशाला दिशा देणारे राज्य म्हणून पाहिलं जायचं, त्या महाराष्ट्राची ही अवस्था. अशा गोष्टी उत्तर प्रदेश-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार करायचे आहे का आम्हाला?”, असेही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader sanjay raut slams raj thackeray over shiv sena party ownership kvg