संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एकदा सत्ताधारी व विरोधकांना आक्रमक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसादही यंदाच्या हिवाळी अधिवेशनावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याचप्रकारे अधिवेशनात घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद मोठ्या प्रमाणावर देशातील राजकारणावर पडत असल्याचं दिसत आहे. द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी लोकसभेत भाषणादरम्यान केलेल्या उल्लेखावरून गेल्या दोन दिवसांपासून देशात अशीच राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. यावरून आता ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते सेंथिलकुमार?

सेंथिलकुमार यांनी लोकसभेत आपल्या एका भाषणामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केलं होतं. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील निवडणूक निकालांचा संदर्भ देत सेंथिलकुमार म्हणाले, “भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्ट्यातच यश मिळतं. आम्ही त्यांना गोमूत्र राज्य म्हणतो”. त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी भाजपानं मोठा गदारोळ केला. एक दिवस त्यावर राजकारण झाल्यानंतर सेंथिलकुमार यांनी दुसऱ्या दिवशी विधानाबद्दल सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. याबाबत सामनामधील अग्रलेखातून ठाकरे गटानं आपली भूमिका मांडली आहे.

“सध्याचा भाजपा देशाबरोबर हिंदुत्वालाही…”

“सध्याचा भाजप देशाबरोबर हिंदुत्वाला सोवळ्यात व शेंडी-जानव्याच्या गाठीत अडकवून ठेवू इच्छित आहे. द्रमुक पक्षाच्या खासदाराने गोमूत्रबाजीवर हल्ला केला, पण भाजपचे हे हिंदुत्व म्हणजे संपूर्ण देशाचे हिंदुत्व नाही. हिंदू म्हणून अभिमान बाळगणारा मोठा वर्ग आधुनिकतेची कास धरतो व त्यांना भाजपच्या शेंडी-जानव्याच्या गाठी मान्य नाहीत. निवडणुका आल्या की, मोदी कपाळास चंदन आणि भस्म लावून सोवळे-पितांबरात एखाद्या मंदिरात जातात व त्याची प्रसिद्धी करतात. हे आता नित्याचेच खेळ झाले. गंगाकिनारी अस्पृश्यांचे पाय धुण्याचे सोहळे पार पाडतात, पण त्याच वेळी कश्मीरमधील आक्रोश करणारा हिंदू पंडित, त्यांचे निर्वासित जीवन त्यांना अस्वस्थ करीत नाही”, अशा शब्दांत अग्रलेखातून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश : ‘इंडिया आघाडी’संदर्भात काँग्रेसमध्ये मतमतांतर, बसपाशी युती करण्याचीही काही नेत्यांची भूमिका!

“भाजपाच्या खेळाला हिंदी भाषिक पट्ट्यात बरकत”

‘प्राण जाय पर वचन न जाय’ हाच खऱ्या हिंदुत्वाचा मंत्र आहे, पण गेल्या आठ वर्षांत किती वचनांची पूर्तता झाली? महागाईपासून बेरोजगारीपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदू बेरोजगार आहेत व मोफत रेशन (५ किलो) देऊन भिकारी बनवणे हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे कोणत्या प्रकारातले हिंदुत्व मानायचे? प्रश्न इतकाच आहे, भाजपसाठी हिंदुत्व हा राजकीय खेळ आहे व या खेळास हिंदी भाषिक पट्टय़ात थोडी बरकत आली आहे”, असं टीकास्र ठाकरे गटानं सोडलं आहे.

“राजस्थानात भाजपाची सत्ता येताच एका आमदाराने…”

“हिंदू धर्मास भाजपा असे कफल्लक करून ठेवतील की एक दिवस ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे अभिमानाने बोलण्याची लाज वाटू लागेल. कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत हे सगळे हेच ठरविणार. निवडणुकांमध्ये हिजाब वगैरे विषय पेटवायचे आणि त्यावर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या. राजस्थानात आता भाजपची सत्ता येताच त्या पक्षाच्या एका आमदाराने जयपूरमध्ये रस्त्यावर उघडपणे फिरत मांसाहारी हॉटेल आणि मांसविक्रीची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. असे हिंदुत्व काय कामाचे?” असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे. “भाजपचे हिंदुत्व मात्र एक दिवस तुम्हा-आम्हाला वल्कले गुंडाळून फिरायला लावेल”, असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams bjp on dmk mp senthilkumar statement gomutra states pmw
Show comments