मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेत नव्याने २०० रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला कार्यक्रम खर्चासाठी ३,५०१ कोटी तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी २,३५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात १४ नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी दुप्पट तरतूद करण्याची घोषणा यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र अर्थसंकल्पात गेल्या वर्षी जाहीर केलेल्या तरतुदीपेक्षा कमी निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी चार हजार कोटींपेक्षा जास्त निधी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी देण्यात आला होता, तर यंदा ३,५०१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करण्याचे धोरण आरोग्य विभागाने जाहीर केले होते. त्याचा विचार करून या योजनेची व्याप्ती वाढवून नव्या २०० दवाखान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी उपचारखर्चाची मर्यादा दीड लाख होती, तीत वाढ करून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. मुंबईत सुरू करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्याच्या अन्य भागांमध्ये ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमध्ये मोफत उपचार तसेच आवश्यक त्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

नवी वैद्यकीय महाविद्यालये कुठे?
राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा समावेश आहे.

ठाणे, कोल्हापूरला मनोरुग्णालये
मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या लक्षात घेऊन जालना, भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे नवी व्यसनमुक्ती केंद्रे सुरु करणार आहेत. ठाणे, कोल्हापूर येथे ८५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक मनोरुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे.

(आरोग्य)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under jan arogya yojana the limit of treatment expenses is rs 5 lakh amy
First published on: 10-03-2023 at 03:27 IST