गेले काही महीने आपण सोशल मिडियावरचा बॉयकॉट ट्रेंड बघत आहोत. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट प्रेक्षकांनी बॉयकॉट केले आहेत. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जरी होत असली तरी अजून अशा कोणत्याच चित्रपटावर बंदी घातली गेलेली नाही, पण अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ हा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
चित्रपटात चित्रगुप्ताचं चित्रण योग्य पद्धतीने केलं नसल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होताना दिसत आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार कुवैतमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याचं स्पष्ट झालं आहे. तिथल्या सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट तिथे प्रदर्शित करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. शिवाय आता सोशल मीडियावर ‘बॉयकॉट थँक गॉड’ हा ट्रेंडही चांगलाच व्हायरल होत आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राच्या पात्राचा एक अपघात होतो आणि मृत्यूनंतर त्याची भेट थेट चित्रगुप्ताशी होते. भारतीय पुराण ग्रंथात चित्रगुप्त हा एक असा देवता आहे जो मानवाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. चित्रपटात अजय देवगण हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत असून ते पात्र फार विनोदी दाखवण्यात आलं असल्याचं म्हंटलं जात आहे. काही भारतीय प्रेक्षकांनादेखील ही गोष्ट प्रचंड खटकली आहे. धार्मिक भावनांना धक्का लागल्याने उत्तर प्रदेशच्या एका वकिलाने या विरोधात तक्रारदेखील नोंदवली आहे.
आणखी वाचा : “ऑडिशन न घेताच..” निलेश साबळेने सांगितला रिॲलिटी शोमधील किस्सा
कुवैत सरकारने हा चित्रपट वगळल्यास सनी देओलच्या ‘चूप’ या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. केवळ इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ या चित्रपटावरच बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती, ‘धमाल’सारख्या विनोदी चित्रपटांच्या सीरिजनंतर पुन्हा एकदा इंद्र कुमार अशीच एक विनोदी कथा घेऊन आले आहेत. भारतात तरी अजून या चित्रपटावर बंदी घातलेली नसून २४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.