‘कॅरी ऑन मराठी’, ‘देऊळ बंद’, ‘कान्हा’, ‘वन वे तिकीट’, ‘डोंगरी का राजा’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बोनस’, ‘पानिपत’ या चित्रपटांतून काम करीत गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘इमली’ ही हिंदी मालिका, तसेच खतरों के खिलाडी यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमधून गश्मीरने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘फुलवंती’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘फुलवंती’मध्ये अभिनेत्याने अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर त्याने महेश मांजरेकर दिग्दर्शित एक राधा एक मीरा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गश्मीर महाजनी काय म्हणाला?

‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, अभिनेता गश्मीर महाजनी हे प्रमुख भूमिकांत दिसले. आता अभिनेत्याने या चित्रपटात काम करण्याविषयी वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले होते. त्यामध्ये चाहते विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे गश्मीर देत होता. एका चाहत्याने त्याला विचारले की ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून तुम्हाला जितके अपेक्षित होते, तितके यश मिळाले का? त्यावर अभिनेत्याने उत्तर देत म्हटले, “मी कधीच त्या बाबतीत काहीच अपेक्षा ठेवली नव्हती. निर्मात्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होणे आवश्यक होते. मी फक्त मदत केली.” पुढे अभिनेत्याने चाहत्याला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहण्याचा सल्ला देत म्हटले की, तुम्हाला चित्रपट नक्की आवडेल. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच या चित्रपटात अभिनयही केला आहे. तसेच मेधा मांजरेकरही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा होती, असे एका चाहत्याने म्हटले. त्यावर गश्मीर महाजनीने म्हटले की, ती इच्छा नक्की पूर्ण होणार. थोडा संयम बाळगा. एका चाहत्याने ‘फौजदार’ चित्रपटाच्या मुख्य नायिकेसाठी कास्टिंग झालं का, असाही प्रश्न विचारला होता आणि त्यावर अभिनेत्याने ‘नाही’ असे उत्तर दिले आहे.

दरम्यान, गश्मीर महाजनी नुकताच ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या गाण्यात त्याच्याबरोबर अमृता खानविलकर दिसली होती. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला-सुजीत या चित्रपटातील हे गाणे आहे. आता गश्मीर महाजनी आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani on did film ek radha ek meera achieve the expected success says i never expected anything from it mrunmayee deshpande nsp