मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासीयांची कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. ज्या प्रवाशांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळाले नाही, ते प्रवासी एसटीचा वाट पकडतात. तसेच मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची पहिली पसंती एसटीला असते. त्यामुळे ४,२०० गट आरक्षणासह एकूण ४,९५३ जादा बस आतापर्यंत पूर्ण भरल्या आहेत.

‘गाव तिथे एसटी’, ‘रस्ता तिथे एसटी’ या ब्रीद वाक्यावर एसटी महामंडळ सुरू आहे. कोकणातील अनेक छोट्या गावांपर्यंत एसटी पोहोचते. त्यामुळेही प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्याने, एसटी महामंडळाने ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; चार जणांना अटक

३ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.