नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचे ‘कर्नाटक कनेक्शन’ उघडकीस आले असून राजश्री सेनवर आणखी एका बाळ विक्रीचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीच्या निधनानंतर प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधातून विधवा महिला गर्भवती झाली. राजश्रीने विधवेच्या तीन दिवसांच्या बाळाची कर्नाटकमधील व्यापारी दाम्पत्याला विक्री केली. नवजात बाळविक्री करणाऱ्या टोळीचा पाठपुरावा सर्वप्रथम लोकसत्ताने केला होता. त्यानंतर नागपुरातील बाळविक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांवर छापे आणि अटकसत्र सुरू झाले, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजश्री सेन हिने नवजात बाळविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी तिने टोळी तयार करून आतापर्यंत २० पेक्षा जास्त नवजात बाळ विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. तिने नुकतेच ३ दिवसांच्या बाळाची कर्नाटक राज्यात विक्री केल्याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुही तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाले. एकाकी जीवन जगत असलेल्या विधवेचे शेजारी गावातील युवकाशी सूत जुळले. त्यातून ती विधवा महिला गर्भवती झाली. त्या दोघांनी बदनामी होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयात जाऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्भपात न झाल्याने तिने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२१ मध्ये ती विधवा नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. यादरम्यान राजश्री सेन हिने मीना तारवानी हिच्यासह रुग्णालयात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. जन्म होताच बाळ दिल्यास झालेला खर्च देण्याचे आमिष दाखवले. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्याने विधवेनेही लगेच होकार दिला. ती महिला प्रसूत होताच तीन दिवसांचे बाळ राजश्रीने ताब्यात घेतले. बाळंत मातेला काही पैसे देऊन घरी रवानगी केली तर त्या बाळासाठी तिने ग्राहक शोधणे सुरू केले.

हेही वाचा- ‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

राजश्रीने महाराष्ट्रात बाळविक्रीचा प्रयत्न केला. मात्र, योग्य भाव मिळत नसल्यामुळे तिने परराज्यात बाळ विक्री करण्याचे ठरवले. मीना तारवानी हिने कर्नाटकातील व्यापारी दाम्पत्य मनीष अग्रवाल आणि रितू अग्रवाल (गुलबर्गा, कर्नाटक) यांची माहिती काढली. त्यांना ५ लाखांत बाळविक्री करण्याचा सौदा केला. त्यांनी लगेच रक्कम देण्याची तयारी दर्शवली. राजश्रीने नागपुरात आलेल्या अग्रवाल दाम्पत्याकडून पैसे घेताच बाळ ताब्यात दिले.

हेही वाचा- बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद

शांतीनगरचे निरीक्षक भारत कऱ्हाडे यांनी राजश्री सेनला अटक केली. तिची चौकशी मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक रेखा संकपाळ यांनी केली. राजश्रीने कर्नाटकात बाळाची विक्री केल्याची बाब तपासात समोर आली. त्यामुळे राजश्रीवर आणखी एक बाळविक्रीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास अजनी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. हा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 days old baby from nagpur sold in karnataka for 5 lakhs adk 83 dpj
First published on: 09-12-2022 at 10:00 IST