अमरावती जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांमध्‍ये महायुतीने निर्णायक आघाडी घेतली असून अचलपूरमध्‍ये प्रहार जनशक्‍ती पक्षाचे उमेदवार बच्‍चू कडू यांना धक्‍कादायक पराभव स्‍वीकारावा लागला आहे. दुसरीकडे, उत्‍कंठावर्धक लढतीत अमरावतीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) सुलभा खोडके यांनी विजय नोंदवला आहे. तर, बडनेरात युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्‍या विजयाची औपचारिकता तेवढी शिल्‍लक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अचलपूरमधून भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्‍चू कडू यांचा १२ हजार १३१ मतांनी पराभव केला. तायडे यांना ७८ हजार २०१ तर कडू यांना ६६ हजार ७० मते प्राप्‍त झाली. काँग्रेसचे बबलू देशमुख यांना तिसऱ्या क्रमांकाची ६२ हजार ७९१ मते प्राप्‍त झाली. अमरावतीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाच्‍या सुलभा खोडके ५ हजार ४९६ मतांनी विजयी झाल्‍या, त्‍यांनी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. खोडके यांना ६० हजार ८७ तर देशमुख यांना ५४ हजार ६७४ मते प्राप्‍त झाली. आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांना तिसऱ्या क्रमांकाची ५४ हजार ५९१ मते प्राप्‍त झाली.

हेही वाचा…वर्धा जिल्ह्यात चौफेर भगवा; देवळीत इतिहास, आर्वीत ओन्ली सुमित, वर्धा व हिंगणघाट येथे हॅटट्रिक

बडनेरातून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी आपला गड राखताना निर्णायक ५४ हजार ५१४ मतांची आघाडी घेतली असून त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी विजय समीप येताच येथील राजकमल चौकात जल्‍लोष केला. १९ व्‍या फेरीअखेर रवी राणांना ९७ हजार ८३९ तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्‍या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना ४३ हजार ३२५ मते प्राप्‍त झाली आहेत.

मोर्शीतून भाजपचे उमेश यावलकर यांनी ५५ हजार ६९८ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. या ठिकाणी चौरंगी लढत झाली. १६ व्‍या फेरीअखेर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार यांना २३ हजार २०१, काँग्रेसच्‍या शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांना २१ हजार २५७ मते प्राप्‍त झाली आहेत.दर्यापुरातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे हे १६ व्‍या फेरीत ९ हजार ८७० मतांनी आघाडीवर आहेत. लवटे यांना ५७ हजार २८९ तर युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांना ४७ हजार ४१९ मते मिळाली आहेत.

हेही वाचा…शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या जागेवर काँग्रेस पिछाडीवर, सांगली पॅटर्न अपयशी

मेळघाटमधून भाजपचे केवलराम काळे यांनी २२ व्‍या फेरीअखेर तब्‍बल ९४ हजार ६६१ मतांची निर्णायक आघाडी घेतली असून त्‍यांच्‍या विजयाची औपचारिकता शिल्‍लक आहे. त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी कॉंग्रेसचे हेमंत चिमोटे यांना ३२ हजार २५८ मते प्राप्‍त झाली आहेत.

हेही वाचा…Assembly Election Results 2024 : अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांची हॅट्ट्रिक, ५० हजारांवर मताधिक्यासह दणदणीत विजय

तिवसामध्‍ये कॉंग्रेसच्‍या नेत्‍या आमदार यशोमती ठाकूर या माघारल्‍या असून १७ व्‍या फेरीअखेर भाजपचे राजेश वानखडे हे ११ हजार २०७ मतांनी आघाडीवर आहेत. तर धामणगावमध्‍ये दहाव्‍या फेरीअखेर भाजपचे प्रताप अडसड हे ७ हजार ७८६ मतांनी आघाडीवर आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati district vidhan sabha election results mahayuti gains lead in five constituencies bachchu kadu faces shocking defeat mma 73 psg