लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना आज, मंगळवारी गडचिरोली भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास विरोध केल्याने पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेत हा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पत्रकारपरिषदेला जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाचे पदाधिकारी अनुपस्थित होते.

२००९ मध्ये तत्कालिन चंद्रपूर आणि चिमूर या दोन लोकसभा क्षेत्रांचे विभाजन करुन गडचिरोली-चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. चंद्रपूरमधून हंसराज अहीर, तर चिमूरमधून महादेवराव शिवणकर आणि नामदेवराव दिवटे अनेकदा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. गडचिरोली-चिमूर या नव्या मतदारसंघातून अशोक नेते दोन वेळा निवडून आले. जिल्हा परिषद आणि नगर परिषदांवरही भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत ही जागा महायुतीच्या मित्रपक्षाला देणे योग्य नाही. भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला तिकिट द्या, पण मित्रपक्षाला नको, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तर दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम नाव घोषित होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच जागा वाचवण्यासाठी गडचिरोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी चालवलेली धडपड सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी वाचा- ‘लव्ह, सेक्स, धोका…’ पती-पत्नीतील बेबनाव दूर करण्याच्या बहाण्याने सात वर्षांपासून शोषण

आजची पत्रकार परिषद खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी झाली. या पत्रकार परिषदेकडे भाजपच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकीकडे कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाला तिकिट नको असे सांगितले असले, तरी भाजपकडून नवख्या उमेदवाराच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. अशा स्थितीत भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि मित्रपक्षांशी असलेला संघर्ष उघड झाल्याचे दिसून येत आहे.

पत्रकार परिषदेला भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, चिमूर येथील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम हटवादे, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, लता पुंघाटे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp struggle for gadchiroli chimur lok sabha opposition to give seats to allies ssp 89 mrj
First published on: 19-03-2024 at 13:31 IST