लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : घरकामासाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीच्या शरीराला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केल्यानंतर अर्थपूर्ण व्यवहार ठेवत ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणाऱ्या वादग्रस्त ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांची अखेर बदली करण्यात आली. या बदलीमुळे चिमुकलीला मदत करणाऱ्या अथर्व नगरीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूर शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्या केल्या आहेत. सात पोलीस निरीक्षकांना नव्याने पदस्थापना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हुडकेश्वर पोलीस ठाणे वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आले होते. घरकामासाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीच्या शरीराला सिगारेटचे चटके देऊन छळ केल्याची घटना अथर्वनगरीत उघडकीस आली होती. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात अझहर शेख आणि तहा अरमान खान यांना अटक केली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांनी आरोपींना मोबाईल फोन, हॉटेलचे जेवन आणि अन्य ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ दिली होती. त्यानंतर आरोपींना लाभ व्हावा या उद्देशाने तपासात त्रृट्या ठेवण्यात आल्याचा आरोप होता. तसेच तिसरी आरोपी हिना खान हिला अटकेपासून सूट दिली होती. त्यामुळेच उपनिरीक्षक राठोड यांना निलंबीत करण्यात आले होते.

आणखी वाचा-गोंदिया : पाण्याच्या टाकीवर चढला, सहा तास थांबला, आणि…

शेवटी या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांना गुन्हे शाखेकडे सोपवला लागला. तसेच हुडकेश्वरचे वादग्रस्त ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांची एस्कॉर्ट सेलला बदली करण्यात आली. तसेच इमामवाड्याचे ठाणेदार प्रशांत माने यांच्याकडे हुडकेश्वर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. रविंद्र नाईकवाड यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली असून नंदनवनच्या ठाणेदारपदी गजानन कल्याणकर यांना देण्यात आली. कनिष्ठ अधिकारी कमलाकर गड्डीमे यांच्याकडे इमामवाड्याचा पदभार देण्यात आला. नवखे अधिकारी नितीन पतंगे यांची बदली वाहतूक शाखेत तर प्रवीण कांबळे यांची बदली सीताबर्डीच्या द्वितीय निरीक्षक पदावर करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of controversial thanedar jagvendra singh rajput adk 83 mrj