वर्धा: शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, हे वर्धा जिल्ह्यावरील लांछन होता होई दूर होईना. योजना येतात आणि जिरतात. आत्महत्यांचा आलेख उंचावतोच. त्यास आळा बसावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रथम शेतकऱ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.जिल्हा सहकारी बँकेस संजीवनी देत शेतकऱ्यांना कर्जवाटप  तर सूरू केले. आता या शेतकऱ्यांनी जोड उत्पन्न घ्यावे म्हणून त्यांना संपन्न शेती ते दाखविणार. तब्बल दोनशे शेतकऱ्यांना घेऊन पालकमंत्री कृषिविषयक प्रयोगाची पंढरी म्हणून परिचित बारामती येथे नेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभ्यासदौ-साठी शेतकरी रविवार १६  फेब्रुवारीला रवाना होणार आहे.निर्सगाचा लहरीपणा व पारंपारिक शेतीस छेद देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा पर्यायच शेतक-यांना  आता राहिलेला आहे.  शेतीसोबतच जोड धंदा करणे देखील आवश्यक झाले आहे. हिच बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्यांना दुग्ध, कुक्क्ट पालन व अन्य शेतीशी संबंधित व्यवसायाची  माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम.  दोनशे पुरूष व महिला शेतकरी अभ्यासासाठी जाणार आहे. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकरी बारामती येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत् कार्यरत कृषी विज्ञान केंद्राला भेट देणार आहे. शेतक-यांसोबत पालकमंत्री देखील उपस्थित राहणार आहे.  स्मार्ट मॅग्नेट कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. यावेळी विशेषज्ञ डॉ. धिरज शिंदे, संतोष गोडसे व डॉ. मिलींद जोशी शेतक-यांना मार्गदर्शन करतील. सकाळी के.व्ही. के प्रक्षेत्र पाहणी, फुलशेती, भाजीपाला प्रात्यक्षिके, एआय तंत्रज्ञान ऊस लागवड, जैविक उत्पादन प्रयोगशाळा, पाणी साठवणूक, शेळीपालन, भाजीपाला नर्सरी, फळपीक नर्सरी, मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन आदी बद्दल संतोष गोडसे व आकाश वालकुंडे मार्गदर्शन् करतील. दुपारी  दुग्ध डेअरीला शेतकरी भेट देतील. यावेळी  आकाश वालकुंडे व डॉ. डी.पी. भोईटे माहिती देतील. अजैविक तण व्यवस्थापन  संदर्भात तज्ञ माहिती देणार आहे. १८  फेब्रुवारीला शेतकरी जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडला भेट देऊन मायक्रो सिंचन प्रणालीची माहिती जाणून घेणार आहे. 

जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पालकमंत्री भोयर यांनी चंग बांधला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी मागील आठवडयात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील तज्ञांशी चर्चा केली होती. जिल्ह्यातील शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात यावे व त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याची सूचना केली होती.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणतात जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन् मिळावे यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेती सोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कट, मत्स्य पालन, फळबाग, भाजीपाला व अन्य शेती विषयक बाबींची माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान  स्विकारून आधुनिक शेती करून आपले उत्पन्न वाढवावे, हाच मुख्य हेतू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha district guardian minister pankaj bhoyar launches plan to eliminate suicide pmd 64 amy