नाशिक – लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय आणि विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभव या विरोधी निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बुधवारी आयोजित निर्धार शिबिराच्या माध्यमातून पुनर्बांधणीला नव्याने सुरूवात करण्यात येत आहे. शिबिराच्या पूर्वसंध्येला शहरात दुचाकी फेरी काढून वातावरण निर्मिती करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंदनगर येथील मनोहर गार्डनच्या सभागृहात हे शिबीर होत आहे. यानिमित्ताने परिसरात भगवेमय वातावरण करण्यात आले आहे. शिबिराची सर्व तयारी पूर्णत्वास गेल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सायंकाळी शहरात दाखल झाले. उद्धव ठाकरे हे बुधवारी येणार असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीच्या धक्क्यातून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात विविध विषयांवर आंदोलन करण्याची संधी असतानाही ठाकरे गटात शांतता आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिबिरातून नवी दिशा देण्याचे नियोजन पक्षाने मार्गदर्शन सत्रांतून केले आहे.

आम्ही इथेच’, महाराष्ट्र कुठे चाललाय, मतदानकेंद्र व्यवस्था व मतदार यादी, संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी, मी शिवसेनेबरोबर का, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हद्दीत घुसखोरी, कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस, बनावट कथानक व लोकशाही या विषयांवर मार्गदर्शन, मंथन होणार आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. दुपारनंतर शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. समारोपप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचा प्रयोग

निर्धार शिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. या माध्यमातून बाळासाहेब स्वत: या शिबिराला उपस्थित आहेत की काय, अशी अनुभूती मिळेल. शिवसेनाप्रमुख हयात असते तर एखाद्या विषयावर त्यांनी काय भाष्य केले असते, असा हा प्रयोग आहे. शिबीर स्थळावरील तांत्रिक बाबींमुळे त्यासमोर काही अडचणी असल्याचा उल्लेख खासदार राऊत यांच्याकडून झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena uddhav balasaheb thackeray party workers hold a bike rally in nashik city amy