नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडून सोमवारी शहरात भेटीगाठी, सदिच्छा भेटीच्या राजकारणाद्वारे परस्परांना शह देण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येत असताना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महापालिका कर्मचाऱ्यांशी संबधित प्रश्नांचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘लवकरच भेटू’ असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

शिवसेना दुभंगल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात परस्परांवर राजकीय कुरघोडीची स्पर्धा सुरू आहे. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक, माजी आमदार शिंदे गटाने गळाला लावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाला राजकीय धक्के देण्याची पुन्हा एकदा तयारी केली आहे.

यातून भेटीगाठी, सदिच्छा भेटीचे राजकारण रंगल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येचा सोमवारी विवाह सोहळा होता. या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सोहळ्यात हजेरी लावली. उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी तत्पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चेला आणखी वेगळे वळण दिले.

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेतील ३६०९ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी, वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, सेवा नियम प्रवेशात दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.

निवेदन स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी या विषयांवर लवकर भेटू असे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. या संदर्भात बडगुजर यांनी रविवारपासून आपण मुख्यमंत्र्याकडे भेटीची वेळ मागितली होती. सोमवारी त्यांनी ही वेळ दिल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याचे सांगितले. या भेटीची माहिती ठाकरे गटाचे खासदार राऊत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना असल्याचा दावा बडगुजर यांनी केला.

हा ज्याचा त्याचा प्रश्न – संजय राऊत

एखाद्याच्या मंगल कार्यात कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत, हा ज्याचा, त्याचा प्रश्न आहे. मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचे असते. त्यांनी कोणाला बोलावले माहिती नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर भाष्य केले. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा आहे. आम्ही सर्व इथे आहोत. कोण कोणाच्या लग्नाला येत आहे, हा राजकीय आणि राष्ट्रीय विषय नसल्याचे त्यांनी सूचित केले.

एकनाथ शिंदेंकडून विलास शिंदेंचे कौतुक

विलास शिंदे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे. अनेक वर्षे आम्ही बरोबर काम केले आहे. कार्यकर्त्याच्या घरी मंगल कार्य असले तर त्याची सर्वांनी यावे, अशी अपेक्षा असते. शेवटी शिंदे शिंदेंकडेच येणार, नाही तर कोण येणार, असा प्रश्न करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मंगल कार्यालय असून राजकीय गणित येथे मांडणार नसल्याचे सूचक विधान केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.