-
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आजवर नऊ वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आताच्या निवडणुकीतही स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे ते दहाव्यांदा शपथ घेणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
-
नितीश कुमार यांनी आजवर प्रत्येकी दोन वेळा भाजपा आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून नंतर ती तोडली आहे.
-
नितीश कुमार यांच्या या राजकीय वृत्तीमुळे त्यांना बिहारच्या राजकारणात पलटू कुमार किंवा पलटू चाचा म्हणून विरोधकांनी संबोधले. ते कोणता निर्णय घेतील, याची कल्पना त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही अनेकदा नसते, असे म्हटले जाते.
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी विरोधकांची इंडिया आघाडी बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी आरजेडी-काँग्रेसबरोबरचे सरकार पाडले आणि भाजपाशी हातमिळवणी केली.
-
त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस आणि आरजेडीने जोरदार टीका केली. भाजपाला पुन्हा एकदा ते सोडचिठ्ठी देऊन पलटी मारतील, असा आरोप तेव्हा तेजस्वी यादव यांनी केला होता.
-
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपापेक्षा चार जागा कमी मिळाल्या आहेत. २०२० साली ४३ जागा जिंकूनही त्यांनी भाजपा आणि आरजेडीला झुंजवले होते. यावेळी जदयूला ८५ जागा मिळाल्या आहेत. तरीही ते यावेळी पलटी मारू शकत नाहीत. कसं ते आकडेवारीतून पाहू.
-
बिहारमध्ये २४३ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ इतका आहे. नितीश कुमारांनी भाजपाला टाळून विरोधकांशी हातमिळवणी केली तरी बहुमत गाठता येणार नाही. कारण त्यांचे ८५, राजद-काँग्रेस आणि मित्रपक्षांचे ३५ मिळून १२० आमदार होतात.
-
बहुजन समाज पक्षाची १ आणि एमआयएमचे ५ आमदार निवडून आलेले आहेत. बसपा आणि एमआयएम यांची मदत घेण्याचा विचार नितीश कुमार किंवा राजद-काँग्रेस करणार नाही. कारण निवडणुकीपूर्वी अशी आघाडी करण्यास त्यांनी नकार दिला होता.
-
भाजपाकडे ८९ आमदार आहेत. लोजप (रामविलास) १९, हम पक्ष ५ आणि रालोम पक्षाचे ४ असे भाजपाकडे ११७ आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना केवळ ५ आमदारांची गरज आहे. अलीकडील सत्तास्थापनेचा त्यांचा अनुभव पाहता त्यांना हे अवघड नाही.
-
नितीश कुमार यांच्या पलटी राजकारणाला त्यामुळे अंकुश लागल्याची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. भाजपासाठी बहुमत गोळा करणे फारसे अवघड नाही. मात्र नितीश कुमार यांच्यासाठी यावेळी महागठबंधनचा प्रयोग करणे अवघड असे दिसत आहे.
Tejashwi Yadav : “पराभवाचं दुःख…”, बिहार निवडणुकीतील अपयशानंतर तेजस्वी यादवांच्या राजदची पहिली प्रतिक्रिया