-
मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. आजही तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या हास्याचे लाखो लोक चाहते आहेत.
-
रंग-रूप याबरोबरच दमदार अभिनय करणारी मधुबालाची आजच्या दिवशी आठवण आल्याशिवाय तिच्या चाहत्यांना चैन पडत नाही.
-
व्हॅलेंटाईन डे च्याच दिवशी ह्या अप्सरेचा वाढदिवस हा एक अतिशय सुंदर योगायोगच म्हणावा लागेल.
-
मधुबालाने ‘बॉम्बे टॉकीज’च्या ‘बसंत’ या चित्रपटात ‘बेबी मुमताझ’ या नावाने पदार्पण केलं होतं. यात तिने बालकलाकार म्हणून काम केलं.
-
१९४९ साली आलेल्या ‘महल’ या चित्रपटातून मधुबालाला ओळख मिळायला सुरुवात झाली. यातील ‘आयेगा आयेगा आनेवाला’ या गाण्यामुळे मधुबाला आणि लता मंगेशकर यांना लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली.
-
नंतर मात्र मधुबालाने मागे वळून पाहिलंच नाही. ‘हावडा ब्रिज’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘काला पानी’, ‘जाली नोट’, ‘नया दौर’, ‘फागुन’, ‘झुमरू’. ‘हाल्फ तिकीट’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून तिने स्वतःच्या अदाकारीची छाप पाडली.
-
अशोक कुमार, किशोर कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, दिलीप कुमारसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर तिची जोडी गाजली.
-
मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या जोडीला मात्र प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
-
या जोडीचा ‘मुघल-ए-आजम’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा आणि अजरामर चित्रपट ठरला.
-
के आसिफ दिग्दर्शित हा चित्रपट खूप कारणांसाठी वेगळा ठरला. याचं कथानक, सादरीकरण, चित्रीकरण, अभिनय, संगीत. नेपथ्य. वेशभूषा या सगळ्यावर सढळहस्ते पैसे खर्च करण्यात आले होते. शिवाय यातील गाणी तर आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
-
त्यातीलच एक म्हणजे ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं त्यातील शब्द, संगीत आणि मधुबालाच्या नृत्यामुळे अजरामर झालं, पण जर तुम्हाला सांगितलं की या गाण्यात मधुबालाचा मुखवटा धारण करून एक पुरुष नाचला आहे. तर यावर तुमचा विश्वास बसेल का?
-
तर हो विश्वास बसणं कठीण आहे, पण हे नृत्य, त्या अदा, ती नजाकत मधुबाला यांची नसून एका पुरुषाची आहे. मधुबाला अभिनेत्री होती यात काहीच शंका नाही, पण नृत्य हा तिचा वीक पॉइंट होता. के आसिफ यांना कधीच मधुबालाचं नृत्य पसंत पडलं नव्हतं. यावर त्यांनी तोडगा काढायचा ठरवला आणि तेव्हा ‘मुघल-ए-आजम’च्या सेटवर चक्क दोन मधुबाला वावरत होत्या.
-
‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यात नाचणारी अभिनेत्री मधुबाला नाही. लक्ष्मी नारायण या पुरुष नृत्यकाराने ते नृत्य केलं आणि त्यांना मधुबालाचा चेहरा देणारा शिल्पकार म्हणजे बी आर खेडकर.
-
त्यावेळी खेडकर यांचं वय केवळ ३३ होतं, अगदी १५ मिनिटांच्या अवधीत मधुबालाच्या चेहऱ्यातील बारकावे हेरून त्यांनी तिचा हेबहुब एक मास्क बनवला. हा भारतात बनवलेला पहिला रबरी मास्क होता.
-
अशा रीतीने तो मुखवटा धारण करून लक्ष्मी नारायण यांनी ‘प्यार कीया तो डरना क्या’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य केलं आणि मधुबालाचं हे गाणं अजरामर झालं. आज आपल्याला जशी मधुबाला आठवते तसे लक्ष्मी नारायण आणि शिल्पकार खेडकर यांची मेहनतसुद्धा आठवायला हवी. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा