-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने कलाविश्वावर आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
वयाच्या ५८ व्या वर्षी देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
-
नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं.
-
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे.
-
आज सकाळी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
-
नितीन देसाई यांच्या निधनानंतर अनेक मंडळींनी वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली दिली आहे.
-
मृणाल कुलकर्णी – दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं !त्यांनी निर्माण केलेल्या ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली आणि त्यानंतर ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनाच्या वेळेला ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत, कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस.. त्यांचे जाणे हा फार मोठा धक्का आहे.
-
हेमंगी कवी – जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच. मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काही बाही धंडाळू लागतो. काय ते कळत ही नाही! पोटात खड्डा पडला बातमी ऐकून! मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहीताना!
-
अक्षय इंडिकर – साम्राज्य उभं केलं असं वाटणारी माणसं आतून किती अनामिक चिंतांनी ग्रासलेली असतात. असं काय असावं की, जगण्याचा खोटा सेट क्षणात उद्ध्वस्त करावा वाटला आजूबाजूचं जग नेपथ्य वाटून? आदरांजली नितीन चंद्रकांत देसाई
-
अमोल कोल्हे – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देसाई कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच नितीन दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
-
नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून नितीन देसाई यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
-
सुबोध भावे – प्रिय नितीन, तुझा बद्दल अभिमान आदर आणि प्रेम नेहमीच होतं आणि कायम राहील. पण तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस हा प्रश्न नेहमी छळत राहील. ज्या तणावातून तू जात असशील असा तणाव कोणाच्याही आयुष्यात न येवो. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. कलाक्षेत्रातील तुझी जागा कोणीच भरून काढू शकत नाही. ओम शांती!
-
रितेश देशमुखने लिहिले आहे की, “भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे महान प्रोडक्शन डिझायनर नितीन देसाई राहिले नाहीत हे जाणून खूप धक्का बसला. त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांप्रती माझ्या हार्दिक संवेदना. मी त्यांना वर्षानुवर्षे ओळखत होतो. माझ्या मित्रा मला तुझी नेहमीच आठवण येत राहील.”
-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनीही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
-
राज ठाकरे – ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही.
-
संजय दत्त – नितीन देसाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. एक उत्तम कला दिग्दर्शक आणि एक चांगला मित्र, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
-
हेमा मालिनी – नितीन देसाई हे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी माझ्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केले आहे. त्यांचे जाणे चित्रपटसृष्टीचे भयंकर नुकसान आहे.
-
मधुर भांडारकर – नितीन देसाई यांच्यासह मला चार उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या मेहनतीमुळे ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, जेल आणि इंदू सरकार हे प्रकल्प अविस्मरणीय झाले.
-
अक्षय कुमार नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल ट्वीट करत म्हणाला, “नितीन देसाई यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं. ते अत्यंत मेहनती कलाकार होते आणि आमच्या चित्रपट क्षेत्राचा एक अविभाज्य घटक होते. त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं आहे. हे खूप मोठं नुकसान आहे. यामुळेच आम्ही आज प्रदर्शित होणाऱ्या ‘ओह माय गॉड २’चं ट्रेलर लाँच रद्द करत आहोत. हा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता प्रदर्शित होईल.”
-
चित्रपटसृष्टीत नितीन देसाई उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही ओळखले जायचे.
-
(सर्व फोटो : सोशल मीडिया)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…