असं म्हणतात, जर एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली तर त्या मेहनतीचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते. आज आपण अशा एका व्यावसायिकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी १० हजार रुपये उधार घेऊन १,१५० कोटींची कंपनी उभारली. (Photo : Social Media) तुम्ही कधी तरी फॅशन दुनियेतील मुफ्ती (MUFTI) ब्रँडविषयी वाचले असेल किंवा ऐकले असेलच. या कंपनीचे मालक कमल खुशलानी यांनी १९९८ मध्ये त्यांच्या दुचाकीवरून कपडे विकण्यास सुरुवात केली होती आणि आज ते हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. आज आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Social Media) कमल खुशलानी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी कमल यांच्यावर आली. (Photo : Social Media) कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कमल यांनी एका कॅसेट कंपनीमध्ये नोकरीसुद्धा केली, पण कमल यांना फॅशन क्षेत्रात आवड होती. त्यांच्या मित्रांकडून ते नवीन कपड्यांबाबत किंवा स्टाइलविषयी नेहमी मतं जाणून घेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी स्वत:चा एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. (Photo : Social Media) १९९२ मध्ये त्यांनी त्यांच्या काकीकडून १० हजार रुपये उधार घेतले आणि पहिला व्यवसाय सुरू केला. त्यांनी शर्ट बनवण्याची कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव होते Mr & Mr. या कंपनीचे ऑफिस आणि फॅक्टरी घरीच होती. कमल डिझायनिंगपासून प्रोडक्शन, सेल्सपर्यंत सर्व काही स्वत: सांभाळायचे. सुरुवातीला या कामातून त्यांना आर्थिकदृष्ट्या बळ मिळाले. (Photo : Social Media) कमल यांना येथेच थांबायचं नव्हतं, त्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. त्यामुळे १९९८ मध्ये त्यांनी 'मुफ्ती' ब्रँड लाँच केला आणि या ब्रँडमुळे पुरुषांचा फॅशन सेन्स बदलला. सुरुवातीचे दिवस सोप्पे नव्हते, पण ऑफिस व कर्मचारी नसल्यामुळे कमल स्वत: दुचाकीवर कपड्यांची बॅग लटकवून निघायचे आणि दुकानदारांना विकायचे. (Photo : Social Media) 'मुफ्ती' ला खरी लोकप्रियता २००० च्या सुरुवातीला मिळाली. या ब्रँडने पुरुषांसाठी स्ट्रेच जिन्स आणली. भारतीय फॅशन क्षेत्रात ही एक नवीन संकल्पना होती. या नवीन संकल्पनेला ग्राहकांची पसंती मिळाली आणि मुफ्तीचे नाव घरोघरी पोहचले. पुढे या ब्रँडचा विकास झाला. कमल यांनी मुफ्तीचे ब्रँड आउटलेट उघडले. (Photo : Social Media) आज देशात ३७९ ब्रँड स्टोअर आहेत, ८९ फॉर्मेट स्टोअर आहेत आणि १,३०५ मल्टी ब्रँड आउटलेट आहेत. शून्यापासून शिखर गाठण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कमल यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण ते कधी डगमगले नाहीत. त्यांनी कधी हार मानली नाही. ते प्रयत्न करत गेले आणि आज ते यशस्वी व्यावसायिक आहेत. (Photo : Social Media) कमल खुशलानी यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायक आहे, जे स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात. आयुष्यात अडचणी कितीही आल्या तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही नक्की यश मिळवू शकता, हे तुम्हाला त्यांच्या जीवनप्रवासातून शिकायला मिळेल. कमल यांनी फक्त ब्रँड निर्माण केला नाही तर नवीन पिढीला स्वप्न पूर्ण करण्याचे बळ दिले आहे. (Photo : Social Media)