-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरावरून या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही पुन्हा तापले आहे. या विधानानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे, तर सत्ताधारी भाजपाकडून त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्या जात असल्याचे म्हटलं जात आहे, एकूणच कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊया.
-
संजय राऊतांनी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना फेसबुक पोस्ट करत राज्यापालांवर टीका केली. “महाराष्ट्राचा स्वाभिमान वगैरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली. एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपाचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला,” असे संजय राऊत म्हणाले.
-
“राज्यापालांचे हे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराजांबाबत एकेरी उल्लेख केला होता. महात्मा फुलेंबाबतही त्यांनी अशाच प्रकारचे विधान केले होते. हे जाणून बुजून होत आहे, की यामागे त्यांचा काही हेतू आहे, हे तपासले पाहिजे. तसेच त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
-
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यापालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीन वर्षांहून अधिक काळ राज्यपालपदी राहल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
-
“राज्यपालांना कोणताही इतिहास माहिती नाही. राज्यपाल मनात येईल तसं बोलत असतात. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही सर्व त्यांच्या विधानाचा निषेध करतो. राज्यपालांची वैचारीक पातळी काय, असा प्रश्न पूर्वी पडत होता. मात्र, या विधानानंतर आता नक्की झालं आहे, की त्यांची कोणतीही वैचारिक पातळी नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
-
“थोड्या दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की, हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नकोत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचकं गुंडाळ,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
-
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यपालांवर टीका केली. “राज्यपाल अशी वेगवेगळी वक्तव्यं का करत आहेत हे कळत नाही. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावं लागतं?,” असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला आहे.
-
दरम्यान, राज्यपालांच्या विधानाचा मनसेकडून निषेध करण्यात आला आहे. “भाजपाने राज्यपालांना काहीतरी समजावून सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज हे आमची अस्मिता आहेत. शिवाजीमहाराज महाराष्ट्रातील मराठी मनाचा मानबिंदू आहेत. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मानबिंदू आहेत. असं असताना एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी कसा काय करू शकते? हे नेहमी कळ लावायचं काम करतात. त्यामुळे त्यांचं नाव ‘कळीचा नारद’ ठेवायला हवं” अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
-
उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यापालांच्या विधानाचा निषेध केला. “सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच दिसतात का? राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबात विधाने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वादग्रस्त व्यक्ती महाराष्ट्रात का ठेवली आहे. त्यांना हटवण्याबद्दल याआधीही मागणी केली होती,” असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
-
तर “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकवेळा वेगवेगळी विधानं करण्यात आलेली आहेत. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी. म्हणूनच यांना विस्मरण होत असावे. अशी विधानं करणाऱ्यांमध्ये विकृती असावी. कदाचित त्यांचा अंतही होऊ शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.
-
दरम्यान, सत्ताधारी भाजपाकडून राज्यपालांच्या विधानावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे. तो पर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे राहणार आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे
-
तर “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. शरद पवार यांना जानता राजा म्हणायचे. आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
-
“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि अनेक पिढ्यांना राहतील. देशात आणि राज्यात शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर देशाने आणि राज्याने करायला हवा,” असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे.
-
दरम्यान, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपालांचे विधान मी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. मात्र, नितीन गडकरी चांगली काम करतायत म्हणून राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असेल,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्य कोणीच करू नये. तसेच पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तर करूच नये. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतो. सर्वांनी बोलताना भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे.
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य