-
राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपानं धक्कातंत्र वापरलं आहे. जुन्या चेहऱ्यांना डावून नव्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही हाच प्रयोग भाजपा करणार का? यावर भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
“आत्ताच सांगितलं पाहिजे की नंतर बोललं पाहिजे,” अशी मिश्किल टिप्पणी तावडेंनी केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
-
भाजपा सत्तेत आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर विनोद तावडे म्हणाले, “हे माझ्याच हातात आहे.”
-
“पण, मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न का पडत नाही. तुम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा,” असं तावडेंनी म्हटलं.
-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले,” असं तावडे म्हणाले.
-
“शिंदे-फडणवीस सरकार राज्यात असतानाच अजित पवार आमच्याबरोबर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती, तर आज अजित पवारांना बरोबर घेतले नसते,” असं विनोद तावडेंनी सांगितलं.
-
“महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल,” असं तावडेंनी स्पष्ट केलं.
-
“भाजपाने २०१४ नंतर राजकारणाची दिशा बदलविली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे लक्ष्य लोकसभेच्या चारशे जागांचे आहे,” असंही तावडेंनी म्हटलं.
-
“इंडिया आघाडी तयार झाली. मात्र, काँग्रेसच्या हेकेखोर भूमिकेमुळे त्यांच्यामध्ये फूट पडली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील सहकारी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहेत. आघाडीमुळे तसेही भाजपाला काही नुकसान नव्हते. मोदींवरील जनतेच्या विश्वासामुळे भाजपाला यश मिळेल,” असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला.

Apple Event 2025 Live Updates: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या