-
लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून यानंतर भाजपाला देशात सत्ता स्थापन करण्यासाठी तेलुगू देशम पार्टी, संयुक्त जनता दलासह एनडीएतील इतर मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
-
एनडीएने २९० जागांवर आघाडी मिळवली असली तर इंडिया आघाडीनेदेखील २३५ जागांवर आघाडी घेतल्यामुळे भाजपाच्या चिंता वाढल्या आहेत.
-
अशा परिस्थितीत इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते, अशा प्रकारची वक्तव्ये इंडिया आघाडीतील नेत्यांनी केली आहे.
-
दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. इंडिया आघाडीने देशात सत्तास्थापनेचा दावा केलाच पाहिजे. हे जुलूम करणारं सरकार उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवायला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
-
ते पुढे म्हणाले, या निवडणुकीच्या निकालातून देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो.
-
सत्ताधारी लोक मस्तवाल झाले तर आपण त्यांना हरवू शकतो, एका बोटाच्या सहाय्याने त्यांना सत्तेतून हटवू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो आणि जनतेने तेच केलं आहे. त्याबद्दल मला जनतेचा अभिमान आहे.
-
उद्धव ठाकरे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडी देशात सत्तास्थानेचा दावा करणार का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सत्तास्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे.
-
उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार असून मी दुपारनंतर त्या बैठकीला जाणार आहे. राज्यातले आमचे खासदार सकाळी मला भेटायला येणार आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर मी दुपारी दिल्लीला जाईन.
-
खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यावेळी माझ्याबरोबर असतील. मी संध्याकाळी इंडियाच्या बैठकीत जाऊन या विषयावर बोलेन.
-
यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार असेल तर तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या आमची बैठक होणार आहे. आघाडी म्हणून आम्ही त्यावर चर्चा करू.
-
आम्ही आघाडी तयार केली तेव्हा आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याबाबत ठरलं नव्हतं. आमच्यापैकी कोणताही नेता सत्तेसाठी आघाडीत आला नव्हता. आमच्यापैकी कोणाचीही तशी इच्छा नाही. देशाचं संविधान वाचवणे, हुकूमशाहाला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र उद्याच्या बैठकीत आमचा नेता ठरेल.
-
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडी टीडीपी, जेडीयू या पक्षांशी संपर्क साधणार का? यावर ते म्हणाले, “जे लोक भाजपामुळे त्रस्त आहेत ते आमच्याबरोबर येतील. सर्व देशभक्त इंडिया आघाडीबरोबर येणार.”
-
“भाजपाने टीडीपीचे प्रमुख ए. चंद्राबाबू नायडू यांना खूप त्रास दिला आहे. तसेच इतर पक्षांनाही या लोकांनी खूप त्रास दिला आहे. ते लोकही आमच्याबरोबर येतील. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आमच्याबरोबर आहेत, भाजपाने त्यांनाही खूप छळलंय. जे जे लोक भाजपाला कंटाळलेत, भाजपावर संतापलेत ते लोक आमच्याबरोबर येतील.”
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “एखादा राजकीय पक्ष त्यांच्या विरोधकांना इतका त्रास कसा काय देऊ शकतो? लोकशाहीत, राजकारणात विरोधक असतातच. परंतु, हा विरोध जीवघेणा असता कामा नये.”
-
“कुठेही सूडाचं राजकारण होता कामा नये. त्यामुळे भाजपाला त्रासलेले देशभक्त इंडिया आघाडीत येतील. आम्ही इतर पक्षांशी बोलणार आहोत. माझं ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं आहे. आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि पुढेही एकत्र राहू”

India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’