-
करमाळ्यातील पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी मोबाइलवर झालेल्या खडाजंगीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. तर अजित पवारांचा पक्ष त्यांची बाजू सावरत आहे.
-
दरम्यान अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावरून शरद पवार यांच्या पक्षात दोन गट पडल्याचे दिसत आहे. अजित पवारांचे चुलत पुतणे रोहित पवार हे त्यांची सातत्याने पाठराखण करत आहेत. तर सख्खे पुतणे युगेंद्र पवार मात्र अजित पवारांची चूक असल्याचे म्हणत आहेत.
-
युगेंद्र पवार यांनी मंगळवारी बारामतीमध्ये बोलताना म्हटले की, कोणालाही अशा प्रकारचे संभाषण आवडणार नाही. मलाही ते आवडले नाही. महिला अधिकाऱ्यांशी बोलताना काय बोलत आहोत, हे पाहिले पाहिजे. झाले ते चुकीचे झाले.
-
युगेंद्र पवारांच्या टिकात्मक विधानानंतर रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांच्या समर्थनार्थ पोस्ट केली.
-
रोहित पवार म्हणाले, “कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की!”
-
“मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
-
दरम्यान अजित पवारांनीही अंजना कृष्णा प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेले आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे”, असे अजित पवार म्हणाले होते.
-
प्रकरण काय आहे?
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूमाचे उत्खनन थांबविण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी कारवाई केली होती. ही कारवाई थांबविण्यासाठी स्थानिकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. यानंतर अजित पवारांनी कारवाई थांबविण्यास सांगितले. -
अंजना कृष्णा यांनी मात्र माझ्या फोनवर फोन करायला हवा होता, असे सांगितले. यानंतर अजित पवारांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच तुमची एवढी हिंमत वाढली का? असेही विचारले.

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार