-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजित कौर हिने मध्यंतरी तिचा नवरा शालीन भानोतविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तारकांना वैयक्तिक जीवनात अशाप्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे.
-
हिंदी चित्रपटसृष्टीत गेली ३७ वर्षे काम करत असलेल्या रती अग्नीहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ३० वर्षांच्या लग्नबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे पती उद्योजक अनिल विराणी त्यांना मारहाण करत असल्याचा आरोप रती अग्नीहोत्री यांनी केला होता.
-
‘बिग बॉस-४’ ची विजेती श्वेता तिवारी आणि अभिनेता राजा चौधरी यांचे प्रकरण इंडस्ट्रीत चांगलेच गाजले होते. राजा चौधरी अनेकदा चित्रीकरणाच्या सेटवर श्वेता तिवारीकडे पैसे देण्यासाठी जबरदस्ती करत असे. श्वेताची वाढती लोकप्रियता तिच्या नवऱ्याला सहन होत नसल्याचे अनेकांकडून सांगण्यात होते. श्वेता तिवारी आपल्या मुलीसाठी सर्व सहन करत होती. मात्र, २००७ मध्ये अखेर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केले.
-
टेलिव्हिजनवरील ‘बालिका वधु’ या मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने मध्यंतरी तिचा माजी प्रियकर मकरंद मल्होत्राने मारहाण आणि धमकावल्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच तो विनाकारण त्यांच्या नात्याविषयी संशय घेत असल्याचेही प्रत्युषा बॅनर्जीने म्हटले होते.
-
काही वर्षांपूर्वी अभिनेता रणवीर शौरी याला पुजा भटने केलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली होती. रणवीरने आपल्या घरी येऊन शिवीगाळ केल्याचा आरोप पुजा भटने केला होता.
-
काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत झीनत अमान यांना त्यांचा प्रियकर आणि अभिनेता संजय खान यांच्याकडून करण्यात येणाऱ्या मारहाणीचे अनेक किस्से ऐकविले जात. अनेकदा भर पार्टीत संजय खानने झीनत अमानवर हात उगारल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर झीनत अमानने अभिनेता मजहर खानशी लग्न केले. परंतु मजहर खाननेही शारीरिक छळ केल्याच्या कारणावरून झीनत अमान यांनी घटस्फोट घेण्याची तयारी केली होती. मात्र, यादरम्यान मजहर खानला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर झीनत अमान यांनी आपला निर्णय मागे घेतला होता.
-
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजनने टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपी गांगुली हिच्याशी लग्न केले होते. मात्र, त्यानंतरच चार महिन्यांनी डिंपीने राहुल ड्रग्जचे सेवन करत असल्याचे आणि तिला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. मध्यंतरी दोघेजण ‘बिग बॉस’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते.
-
मिस युनिव्हर्स युक्ता मुखी हिने २००८मध्ये न्यूयॉर्कस्थित उद्योगपती प्रिन्स तुली यांच्याशी विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर पती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती आणि मारहाण करत असल्याची तक्रार युक्ता मुखीने दाखल केली होती.
-
मॉडेल रेहा पिल्लई हिने तिचा पती टेनिसपटू लिएंडर पेसने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. याशिवाय, तिने लिएंडर पेसच्या वडिलांवरही काही आरोप केले होते.
-
अभिनेत्री रूचा गुजरातीने २०१०मध्ये पती मितुल संघवीविरुद्ध आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. मितुल आपल्याला उपाशी ठेवत असल्याचेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक