-
भारतीय कृषी संशोधन संस्थेने आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना १.६३ कोटी रुपयांच्या मागणीची नोटीस बजावली आहे.
-
सध्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दुर्गा शक्ती नागपाल यांच्यावर मे २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान, त्यांची प्रतिनियुक्ती संपल्यानंतरही दिल्लीतील पुसा कॅम्पसमधील अधिकृत टाइप VI-A बंगला अनधिकृतपणे ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे.
-
२०१० च्या बॅचच्या उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना १९ मार्च २०१५ रोजी बंगला बी-१७ देण्यात आला. त्यावेळी त्या तत्कालीन कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्या ओएसडी होत्या. एका महिन्यानंतर त्यांनी बंगल्याचा ताबा घेतला, त्यासोबतच दरमहा ६,६०० आणि पाणी शुल्कही दिले.
-
उपलब्ध माहितीनुसार, कृषी मंत्रालयातील त्यांची प्रतिनियुक्ती मे २०१९ मध्ये संपली, परंतु वाणिज्य मंत्रालयात त्यांच्या नंतरच्या पोस्टिंग दरम्यान आणि २०२१ मध्ये त्यांच्या होम केजरमध्ये परतल्यानंतरही त्यांनी दिल्लीतील सरकारी बंगल्याचा ताबा आपल्याकडेच ठेवला होता.
-
आयएआरआयने दिल्ली पोलिसांच्या मदतीने बंगल्याचा ताबा परत मिळवण्यासाठी तक्रार दाखल केल्यानंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी अखेर बंगला सोडला होता.
-
इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमनच्या माजी विद्यार्थिनी दुर्गा शक्ती नागपाल यांनी संगणक शास्त्रात बी.टेक केले आहे. २०१० मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत भरती झाल्या आणि राज्य आणि केंद्र सरकारमधील त्यांच्या विविध कामांद्वारे सर्वांचे लक्ष वेधले होते.
-
दुर्गा शक्ती नागपाल यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी आयएएस कारकिर्दीची सुरुवात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांच्या ओएसडी म्हणून केली, त्यानंतर वाणिज्य मंत्रालयात उपसचिव म्हणून पोस्टिंग झाली. नंतर, त्या वैद्यकीय शिक्षणाच्या विशेष सचिव म्हणून उत्तर प्रदेशात परतल्या होत्या.
-
एप्रिल २०२३ मध्ये, दुर्गा शक्ती नागपाल बांदाच्या जिल्हाधिकारी झाल्या होत्या. सध्या त्या लखीमपूर खेरीच्या जिल्हाधिकारी आहेत.
-
दुर्गा शक्ती नागपाल यांचा दावा आहे की, पालकांच्या आजारपणामुळे त्यांना या बंगल्यात जास्त काळ राहण्याची अधिकृत परवानगी मिळाली होती. त्यांनी त्या कालावधीचे भाडे आधीच दिले आहे.
-
“मला त्या बंगल्यात आणखी काही काळ राहण्याची परवानगी देण्यात आली होती आणि मी त्याचे भाडे आधीच भरले आहे. काही कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे नोटीस मिळाली आहे. मी त्यांच्याकडून सूट मागितली आहे आणि प्रक्रिया सुरू आहे”, असे दुर्गा शक्ती नागपाल यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. (All Photos: @DurgaShaktiIAS)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?