-
राज्यात आणि देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातलं आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, नव्या जिनोम सिक्वेन्सिंगमधून आलेल्या माहितीवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या नेतृत्वाबद्दलही भाष्य केलं आहे. रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली असून, डबल म्युटेशनचा अर्थही उलगडून सांगितला आहे. "जिनोम सिक्वेन्सिंगसाठी घेतलेल्या महाराष्ट्रातील ३६१ नमुन्यांपैकी ६१% नमुन्यांमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे पुण्याच्या 'एनआयव्ही'मधील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही किमान दहा राज्यांमध्ये डबल म्यूटेशनचे नमुने आढळल्याचे स्पष्ट केलं आहे. अचानक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे डबल म्यूटेशनही कारणीभूत असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली होती. भारतात आढळलेल्या B.1.617 या डबल म्यूटेशन व्हेरियंटमध्ये ब्राझील, आफ्रिकन प्रकारचा E484Q आणि कॅलिफोर्निया प्रकारचा L452R हे दोन व्हेरियंट आढळले असल्याची माहिती मिळतेय," असं रोहित पवार म्हणाले. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
या दोन्ही म्युटेशनचा अर्थही रोहित पवारांनी सोप्या पद्धतीने सांगितला आहे. "घरफोडी करण्यात सराईत असलेल्या एखाद्या चोरांच्या टोळीला जर सायबर क्राईम करणारी टोळी येऊन मिळाली तर दोन्ही टोळ्या मिळून नवी तयार होणारी टोळी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवू शकते, त्याप्रमाणे ब्राझील, आफ्रिकन व्हेरियंट मानवी शरीरात अत्यंत सहजरित्या प्रवेश करून अत्यंत वेगाने पसरतात. तर कॅलिफोर्निया व्हेरियंट शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. परिणामी डबल म्यूटेशन व्हेरियंट वेगाने तर पसरणारा आहेच शिवाय प्रतिकारशक्ती आणि लसीचा प्रभाव यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळं डबल म्यूटेशन व्हेरियंट हा नक्कीच चिंता करण्याचा विषय आहे," असं म्हणत रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केलीये. (संग्रहित छायाचित्र। रॉयटर्स)
-
"आपल्या देशात आढळलेला डबल म्यूटेशन व्हेरियंट काही दिवसांपूर्वी अमेरिका, जर्मनी, युके, आस्ट्रेलिया या देशांमध्येही आढळला होता. जर्मनी मध्ये सद्यस्थिती अतिशय गंभीर आहे तर फ्रान्समध्ये मृत्यूंची संख्या एक लाखाच्या जवळ पोहचलीय. ब्रिटनमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या ठिकाणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. आफ्रिकेत आलेल्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढला होता. पहिली लाट ज्या देशांमध्ये तीव्र नव्हती त्या देशांमध्ये दुसऱ्या लाटेची तीव्रता मात्र खूप असल्याचं दिसतं." (NEXU Science Communication/via REUTERS)
-
"महाराष्ट्रात बघितलं तर पहिल्या लाटेत काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या नव्हती, मात्र दुसऱ्या लाटेत त्या जिल्ह्यांमध्ये मोठी रुग्णसंख्या पहायला मिळाली. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याने तसेच गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाल्याने तसेच लोकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने करोनाचे घातक परिणाम आपण रोखू शकत आहोत. भविष्यातही आपल्याला आणखी दक्षता घ्यावी लागणार आहे. आज देशात काहीशी आफ्रिकेतील दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती दिसत असून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्येही रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. त्यामुळं या राज्यांनी आता अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे." (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
"गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला राज्य सरकारची अकार्यक्षमता जबाबदार असून देशाच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र अडचणीचा ठरत असल्याचे अत्यंत दुर्दैवी विधान केले. मग हाच निकष लावायचा तर आज इतर राज्यांमध्ये वाढणारी रुग्णसंख्या पहिली तर त्यासाठी तेथील राज्य सरकारे जबाबदार आहेत, असं ते म्हणणार का? एखादा चोर तुरुंगात गेल्यावर तिथं इतर चोरांकडून नवनवीन कौशल्ये शिकून अजून सराईत चोर बनण्याची शक्यता असते त्याप्रमाणे कोविडचा प्रसार जितका जास्त होईल तितके म्युटेशन्स जास्त वाढून हा व्हायरस अजूनच वेगवेगळी रूपे धारण करण्याची शक्यता वाढते," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
(फोटो- संग्रहित-इंडियन एक्स्प्रेस)
-
"आपल्या देशात Genome sequencing साठी डिसेंबर अखेरीस हालचाली सुरु झाल्या. प्रत्येक राज्यातील किमान ५% नमुन्यांचे तर विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या सर्वच नमुन्यांची Genome sequencing करण्यास केंद्राने सांगितलं परंतु आतापर्यंत केवळ १२ ते १३ हजार नमुन्यांची sequencing करण्यात आली आहे. नवे स्ट्रेन्स, व्हेरियंट ओळखण्यात आपण अपयशी ठरलो ही वस्तुस्थिती आहे. असो, परंतु येणाऱ्या काळात याबाबतीत असं निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल," असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
"आरोग्य हा जरी राज्यांचा विषय असला तरी करोनाचे जागतिक संकट बघता केंद्र सरकारने नेतृत्व स्वीकारत राज्यांना आवश्यक ते सहकार्य करणं गरजेचं होतं. सुरवातीच्या काळात केंद्राने याबाबत नेतृत्व केलं पण जसजसी रुग्णसंख्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जायला लागली, तेंव्हा मात्र केंद्र सरकारने पद्धतशीरपणे बाजूला होत राज्यांवर जबाबदारी ढकलून दिली. यंदाच्या जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली तेंव्हा केंद्र सरकार पुन्हा सक्रीय झाले आणि देशाने करोनावर विजय मिळवल्याचे आपल्या नेतृत्वाने जाहीर करून टाकले," अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
"गुजरात सरकार करोना रुग्णांची देत असलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेल्या रुग्णांची संख्या यात तफावत असल्याचं गुजरात उच्च न्यायालयाने कालच (१५ एप्रिल २०२०) म्हटलंय. काही राज्यांमध्ये तर मृत्यूंची आकडेवारीही लपवली जात असल्याचं अनेक ठिकाणी निदर्शनास आलंय. महाराष्ट्रात रुग्णसंख्या जरी जास्त असली तरी आपली आकडेवारी मात्र पारदर्शक आहे आणि हीच पारदर्शकता आपल्याला या संकटावर मात करण्यास मदत करणार आहे," असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
"आज करोनाविरुद्धच्या लढाईत आकडेवारीची पारदर्शकता तसेच संयमी आणि संकटाचे गांभीर्य असलेले नेतुत्व गरजेचं आहे. सुदैवाने या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात तरी आहेत. करोनाचे नवे स्ट्रेन्स, व्हरियंट अत्यंत घातक असून त्यांचा प्रसाराचा वेग प्रचंड आहे. त्यामुळं नागरिकांनाही गांभीर्याने वागणं गरजेचं आहे. विनाकारण बाहेर न फिरणे, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्या सूचना पाळून स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे. सर्वांनी सहकार्य केलं तरंच करोनाची ही साखळी आपण तोडू शकतो, याचं भान सर्वानीच ठेवायला हवं," असं आवाहन रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ