-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसोबत त्यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांचीही पाहणी केली.
-
विशेष म्हणजे अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एकाच गाडीने प्रवास केला. यावेळी आदित्य ठाकरे गाडी चालवत होते.
-
सकाळी ७ वाजता कोणालाही माहिती न होऊ देता अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली होती.
-
मात्र ९ वाजता प्रसारमाध्यमांना माहिती मिळाली आणि सर्वांनी त्यांना कव्हर करण्यास सुरुवात केली.
-
आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरला फोटो शेअर केले असून आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझ्या वरळी मतदारसंघात तसेच दादर आणि माहीम येथील टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत केली जाणारी विकासकामे दाखवण्याची संधी मिळाली असं सांगितलं आहे.
-
तसंच आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दर्जेदार कामे असावीत, असा नेहमी आग्रह असतो. माझ्यासारख्या तरुण आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच प्रोत्साहन देत असतात, त्याबद्दल त्यांचे आभार असंही म्हटलं आहे.
-
पाहणी दौऱ्यावेळी अजित पवारांनी आदित्य ठाकरेंकडून अनेक गोष्टी जाणून घेतल्या, तसंच काही सूचनादेखील केल्या. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुकदेखील केलं.
-
पण हा दौऱा इतका गुप्त का ठेवण्यात आला अशी चर्चाही होऊ लागली. सोबतच अजित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या या एकत्रित पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा रंगली. या सर्व प्रश्नांना अजित पवारांनी उत्तरं दिली.
-
“विकासकामं पाहण्याची उत्सुकता होती”
“बऱ्याच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदित्य ठाकरेंना सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे फोटो माझ्या मोबाइलवर आले आहेत. त्यामुळे काय विकासकामं सुरु आहेत हे पाहण्याची उत्सुकता मला होती. त्यामुळे आम्ही दोघांनी सकाळी वरळीपासून ते माहीमपर्यंत पाहणी करायचं ठरवलं होतं. हा आमचा खासगी दौरा होता. कोणाला त्रास होऊ नये आणि नीट पाहणी करता यावी यासाठी कोणाला सांगितलं नव्हतं,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. -
“चांगल्या उद्धेशाने मला हे पहायचं होतं. त्यामुळेच आम्ही प्रसारमाध्यमांना काही माहिती दिली नव्हती. सकाळी ७ ते ९ आमचा चांगला दौरा झाला. त्यानंतर तुम्हाला माहिती मिळाली. काही लोक मुद्दामून जातात, पाहणी करतात…मग असं बोटं करा सांगत फोटो काढले जातात. आम्हाला तसली कोणतीही नौटंकी करायची नव्हती. आमचा त्यासंबंधी कोणताही विचार नव्हता. चांगल्या कामाला जास्त काही मदत हवी तर केली पाहिजे या मताचे आम्ही असल्याने ही पाहणी केली,” असं अजित पवारांनी सांगितलं.
-
“जिथे चांगलं चाललं आहे ते पाहून आपल्या भागातही राबवावं असा प्रयत्न आहे. मुंबई चांगली दिसावी तसंच मुंबईत खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तसंच युवा नेते आदित्य ठाकरेंचा आहे. सर्वांनी एकत्र काम करण्याचं ठरलं आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचाही अधिकार आहे. निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यासंबंधी सध्या चर्चा करण्याचं काही कारण नाही”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
-
“मुंबई, मुंबई उपनगराला कमी निधी मिळतो”
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे करोनाच्या संकटातही अडचणी न येता कामं होत आहे. आदित्य ठाकरे, अदिती तटकरे असे कही तरुण सहकारी मंत्रिमंडळात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा करत असताना त्या जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या यासंबंधी एक नियम केला जातो आणि वाटप केला जातो. पण त्या मानाने मुंबई, मुंबई उपनगराला कमी निधी मिळतो. मुंबई देशाची आर्थिक राजनाधी असून आणखी निधी मिळाला तर चांगली कामं करता येतील. सीएसआरचा फंड काही प्रमाणात राज्य सरकारचा फंड. पालिकेचा फंड अशा पद्दतीने एकत्र येऊन काही चांगल्या गोष्टी काम करण्याचा प्रयत्न आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं. -
“माहीम किल्ला, वरळी किल्ला ही ठिकाणं चांगली करण्याचा प्रयत्न आहे. जर कोणी चांगलं काम करत असेल तर आपणदेखील पाहावं असा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक दिवशी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. काय अडचणी आहेत वैगेर यांची माहिती घेतो. दरम्यान या कामांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छतेला महत्व देण्यात आलं असून झाडं तोडली जाणार नाहीत याचं कटाक्षाने पालन केलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव भिंती बाधल्याचं मी पाहिलं. त्या भिंती आदित्य ठाकरेंनी काडल्या असून रेलिंग लावलं आहे. फ्लायओव्हरच्या खाली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. सायकल ट्रॅक करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं सांगत अजित पवारांनी कौतुक केलं.
-
निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेचसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्रीदेखील अनेकदा मातोश्रीवरुन वर्षावर येताना गाडी चालवतात. गाडी चालवली म्हणून असे अंदाज बांधण्याची गरज नाही. आमचं तीन पक्षांचं सरकार असून काही मित्रपक्षांनीही पाठिंबा दिला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
-
“मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी याआधीही सांगितलं आहे. आमची जेव्हा कधी मंत्रिमंडळ बैठक होते तेव्हा काही चॅनेल अशा बातम्या चालवतात. अशा काही बातम्या चालवू नका. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा,” असं अजित पवारांनी सांगितलं. (Photos: Twitter)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा