-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. द कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याच्या मागणीपासून ते निवडणुकांपर्यंत अशा विविध विषयांवरून त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
-
दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी भाजपावर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असल्याचा आणि निवडणुका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
-
भाजपाशासित केंद्र सरकारने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगावर दबाव आणला. कारण त्यांना आम आदमी पक्षासारख्या छोट्या पक्षाची भिती वाटते, असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सगळ्या सात जागांवर अपयश मिळाल्यापासून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करणं टाळलं आहे.
-
२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधीही त्यांनी केवळ त्यांच्या पक्षाने केलेल्या कामावरच अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. पण पंजाब विधानसभा निवडणुकांमधल्या अभूतपूर्व विजयानंतर केजरीवाल यांनी काल पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ५६ इंच छातीचे दावे खोटे असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
-
केजरीवाल म्हणाले, “डिसेंबरमध्ये गुजरातमधल्या निवडणुका होणार आहे, त्यावेळी लोक म्हणत आहेत की भाजपा हरणार. जर ते हरण्याची शक्यता असेल तर ते निवडणुकांच्या १० दिवस आधी निवडणूक आयोगाला पत्र लिहतील आणि सांगतील की आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र एक करत आहोत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील”.
-
“पुढच्या वेळी जेव्हा लोकसभा निवडणुका हरतोय असं वाटेल तेव्हा ते म्हणतील संसदीय कार्यपद्धती वाईट आहे त्यामुळे आम्ही अध्यक्षीय सरकार आणत आहोत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला. काय आहे हा ड्रामा? कसली नौटंकी चाललीये”, केजरीवाल म्हणाले.
-
केजरीवाल पुढे म्हणाले, “भारत हा लोकशाही देश आहे. इथले लोक ही नौटंकी सहन करणार नाहीत. ते म्हणतात की ते सर्वात मोठा पक्ष आहेत आणि आम्ही छोटा पक्ष आहोत. तरीही तुम्हाला भीती वाटतेय?”
-
“जर तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका लढवा. नुसतं म्हणता ५६ इंचाची छाती आहे. निवडणुका होऊद्या, नाहीतर कुर्त्यामध्ये ५६ इंचाची छाती नाहीये ते फक्त खोटं आहे. “, असंही ते यावेळी म्हणाले.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर