-    बिहारचे राज्य पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सुरु केल्यापासून अनेकदा पांडे टीव्हीवर मुलाखती देताना पहायला मिळाले आहेत. या प्रकरणामध्ये सीबीआयने सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. मात्र त्यापूर्वी काही दिवस बेपत्तात झालेली सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीला आम्ही शोधून काढू असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी, "रिया चक्रवर्तीविरुद्ध पाटणा पोलिसांना पुरावा मिळाला तर अगदी जमीन खोदूनही आम्ही तिला शोधून काढू" असं म्हटलं होतं. अनेक मुलाखतींमध्येही पांडे ओरडून बोलताना दिसतात. त्यामुळे तेच सोशल मिडियावरची चर्चेचा विषय ठरत आहेत. (फोटो : facebook.com/officialDGPBihar) 
-    मात्र अनेकांना ठाऊक नसेल पण पांडे यांनी २००९ साली लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्ती घेतली होती. बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या पांडे यांना बक्स मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळेल असं पांडे यांना वाटलं होतं. यामुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. २००९ साली मार्च महिन्यामध्ये त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. हा फोटो २०१८ साली पांडे यांनीच फेसबुकवर पोस्ट केला होता. 
-    मात्र पांडे यांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. बक्सरचे तत्कालीन भाजपा आमदार लालमुनी चौबे यांना पक्ष तिकीट नाकारेल आणि आपल्याला संधी देण्यात येईल असं पांडे यांना वाटलं होतं. (फोटो : facebook.com/officialDGPBihar) 
-    चौबे यांनी आक्रमक भूमिका घेत तिकीट न मिळाल्यास भाजपा उमेदवाराच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर पक्षाने चौबे यांना तिकीट दिलं आणि पांडे यांचे राजकारणात उतरण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, असं 'इंडिया टुडे'ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. 
-    निवृत्ती घेतली तरी निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने निवडणुकीनंतर ९ महिन्यांनी पांडे यांनी बिहार सरकारकडे निवृत्ती मागे घेण्याची इच्छा असल्याचे पत्र लिहिले. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या नितिश कुमार सरकारने पांडे यांची विनंती मान्य करत त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्यास परवानगी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआदी ते बिहारचे पोलीस महासंचालक झाले. 
-    पाच वर्षांपूर्वी पांडे यांची सीबीआयकडून चौकशी झाली होती. मुज्जफरापूरमध्ये गाजलेल्या १२ वर्षीय मुलीच्या अपहरणच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीसंदर्भात सीबीआयकडून पांडे यांची चौकशी झाली होती. नवरुना चक्रवर्ती या १२ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी पांडे हे मुज्जफरापूरचे आयजी होते. यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण करण्याच्या कटामध्ये पांडे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. आमची जमीन हडपण्यासाठी हे अपहरण करण्यात आलं असून या कटामध्ये पांडेंचाही समावेश असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांना केला होता. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आरोपी म्हणून पांडे यांचे नावही होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचे गूढ अद्याप उघड झालेले नाही. (फोटो : पीटीआय) 
-    पांडे यांनी भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना तत्कालीन नागरी हवाई उड्डाण मंत्री असणाऱ्या शहानवाज हुसैन यांच्यासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणूनही काम केलं आहे. (फोटो : twitter.com/ips_gupteshwar) 
-    पांडे यांचा जन्म १९६१ साली बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गेरुआबांध या गावी झाला आहे. त्यांनी पाटणा विद्यापिठामधून संस्कृतमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी युपीएससीची परीक्षाही संस्कृतमधूनच दिली. ते पहिल्या प्रयत्नामध्येच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. (फोटो : facebook.com/officialDGPBihar) 
-    पांडे यांनी नक्षलग्रस्त औरंगाबाद, जेहानाबाद, अरवल, बेगुलसराय आणि नालंदासारख्या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. (फोटो : facebook.com/officialDGPBihar) 
-    पांडे यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंगेर आणि मुज्जफरापूर झोनमध्ये काम केलं आहे. त्यानंतर ते मुज्जफरापूरचे पोलीस निरीक्षक झाले आणि नंतर ते पोलीस दलाच्या प्रशिक्षण विभागाचे पोलिस महासंचालक झाले. वर्षभरापूर्वी त्यांची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (फोटो : twitter.com/ips_gupteshwar) 
-    बिहारमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करण्यामध्ये पांडे यांचे मोलाचे योगदान आहे. २०१६ साली राज्यात दारुबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पांडे यांनी राज्यभरात दौरा करुन दारुबंदीची अंमलबाजवणी नीट होत आहे की नाही याची पहाणी केली होती. (फोटो : twitter.com/ips_gupteshwar) 
-    मागील महिन्यामध्येच म्हणजेच जुलैमध्ये पांडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी विकास दुबेला हिरो बनवणाऱ्यांना झापलं होतं. गुन्हेगार कोणत्याही जातीचा धर्माचा आणि गटाचा असला तरी तो गुन्हेगार असतो. तो केवळ एका विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा समुदायाचा असल्याने त्याला हिरो बनवू नका. असं करुन तुम्ही प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला दुबळं बनवत आहात, असा संताप पांडे यांनी व्यक्त केला होता. 
-    दुबे सारख्या गुन्हेगारांची पाठराखण केली जाते ही लज्जास्पद गोष्ट असल्याचे पांडे यांनी म्हटलं होतं. “बिहार पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस वेगळे आहेत का? संपूर्ण देशातील पोलीस खातं एक एकच आहे. उत्तर प्रदेशमध्ये आठ पोलिसांची हत्या करुन तो (विकास दुबे) बिहारमध्ये पळून येईल आणि इथून सुरक्षित निघून जाईल? असं कसं होईल?,” असा प्रश्नच पांडे यांनी बिहारमध्ये आल्यावर दुबे सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित केला होता. (फोटो : एएनआय) 
-    “एका व्यक्तीने त्याला (विकास दुबेला) विशिष्ट जातीचा सेवक असल्याचे सांगितले. हे लज्जास्पद आहे. हीच वृत्ती गुन्हेगारी संस्कृतीला खतपाणी घालते. आपल्या आपल्या जातीच्या लोकांना यामध्ये अगदी चोऱ्यामाऱ्या करणारे, बलात्कार करणारे, अपहरण करणाऱ्यांना, हत्या करणाऱ्यांना लोकं हिरो बनवत आहेत. अशाप्रकारे आपल्या जातीच्या गुन्हेगारांना लोकं हिरो बनवू लागले, हार घालू लागले, त्यांची पुजा करु लागले तर अपराधी वृत्ती वाढत जाणार. अशाप्रकारे चुकीच्या व्यक्तींना हिरो बनवून तुम्ही प्रशासनाला, शासनाला आणि पोलिसांनी दुबळं करत आहात,” अशा शब्दांमध्ये दुबेची पाठराखण करणाऱ्यांना डीजीपींनी सुनावले होते. (फोटो : एएनआय) 
-    तो शेर तर पोलीस उंदीर आहेत का? >> “तुम्ही जर त्या विकास दुबेला शेर (धाडस करणारा) म्हणत असाल तर जे आठ पोलीस मारले गेले ते काय उंदीर होते का? आरोपी आणि गुन्हेगार आता शेर होऊ लागलेत. आता बिहारमध्ये आम्ही त्याला दाखवतो की आम्ही अशा सिंहांची शिकार कशी करतो,” अशा शब्दांमध्ये पांडे यांनी दुबेला बिहार पोलीस सोडणार नाही असा इशारा दिला होता. (फोटो : एएनआय) 
-    मग क्रांतीकारी कोण होते? >> “दुबेसारख्या गुन्हेगारांना सिंहाची उपमा देत असाल तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले क्रांतीकारी कोण होते?, या प्रश्नाचे उत्तरही गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्यांनी द्यावं,” असंही पांडे यांनी म्हटलं आहे. “देशासाठी तसेच समाजासाठी जगणारे आणि त्यासाठी प्राणांची आहुती देणारे खरे शेर असतात. गुन्हेगार कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा गटाचा असला तरी तो केवळ गुन्हेगार असतो. काही लोकं या गुन्हेगारांना हिरो बनवत आहेत हे लज्जास्पद आहे,” असंही पांडे म्हणाले होते. 
-    सर्वांना मिळून गुन्हेगारी संपवावी लागेल >> गुन्हेगारी संस्कृतीविरोधात सर्व जनतेला एकत्र लढावं लागेल. गुन्हेगारी केवळ पोलीस संपवू शकत नाही. त्यामुळेच गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा गटाचा असो त्याला हिरो बनवू नका, त्याला सन्मान देऊन नका, त्याला पाठीशी घालू नका, असं आवाहनही पांडे यांनी केलं होतं. (फोटो : facebook.com/officialDGPBihar) 
 
  अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी….. 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  