-
कंपनीकडून मिळत असणाऱ्या वागणुकीमुळे असंतुष्ट असणाऱ्या मर्सिडीज बेंझच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या मालकीच्या गाड्यांच्या प्लॅण्टमध्ये गोंधळ घातल्याची घटना स्पेनमध्ये समोर आली आहे. संतापलेल्या या ३८ वर्षीय व्यक्तीने ५० नवीन गाड्यांना नुकसान पोहचवलं आहे. ज्या ठिकाणी हा कर्मचारी काम करत होता तेथेच त्याने कंपनीच्या गाड्यांना नुकसान केलं आहे. त्याने ५० गाड्यांची तोडफोड केली असून त्यामुळे ६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ४४ कोटींचं आर्थिक नुकसान कंपनीला झालं आहे.
-
३१ डिसेंबर रोजी या कर्मचाऱ्याने कंपनीच्या जवळच्या परिसरामधून जेसीबीचा ताबा मिळवला. व्हिक्टोरिया प्रांतातील बास्क्यू शहरातील औद्योगिक परिसरात असणाऱ्या मर्सिडीज बेंझच्या प्लॅण्टमध्ये हा जेसीबी घेऊन कर्मचाऱ्याने प्रवेश केला. कंपनीच्या प्लॅण्टचं गेट तोडून हा कर्मचारी आतमध्ये शिरला. प्लॅण्टमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर या व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने अनेक गाड्यांना धडक दिली. काही गाड्यांना उचलून दुसऱ्या गाड्यांवर फेकून दिलं आणि कंपनीला जास्तीत जास्त नुकसान होईल या विचाराने तो प्लॅण्टमध्येच गोंधळ घालू लागला.
-
समोर आलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रीक व्हेइकल विभागातील गाड्यांची जेसीबीच्या मदतीने मोडतोड केल्यानंतर या व्यक्तीने कंपनीचे उत्पादन असणाऱ्या महागड्या व्ही क्लास गाड्यांच्या विभागातही तोडफोड केली. या गाड्या ९० हजार पौंडला (अंदाजे ८९ लाख रुपयांना) विकल्या जातात. या कर्मचाऱ्याने कंपनीच्या प्लॅण्टमध्ये घातलेल्या गोंधळाचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
-
व्हायरल फोटोंमध्ये कंपनीच्या प्लॅण्टमध्ये जेसीबीच्या सहाय्याने या व्यक्तीने किती नुकसान केलं आहे याचा अंदाज बांधता येईल अशी दृष्य दिसत आहेत. काही फोटोंमध्ये गाड्यांवर गाड्या चढवण्यात आल्यात तर काही फोटोंमध्ये गाड्यांचे नुकसान करण्यात आलं आहे. हा कर्मचारी एवढा संतापलेला होता की समोर येईल त्या गोष्टीवर तो जेसीबी चालवत होता. त्यामुळेच पोलीस येईपर्यंत येथील सुरक्षा रक्षकांना या व्यक्तीला थांबवण्यासाठी हवेत गोळीबारही करावा लागला. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
-
पोलिसांनी या कर्मचाऱ्याला अटक केली असून सध्या ते या प्रकरणाचा तपास करत आहे. २०१६ ते २०१७ दरम्यान या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहचलो तेव्हा हा कर्मचारी जेसीबीमध्ये बसून गाड्यांची तोडफोड करत होता. आम्ही त्याला तातडीने ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. हा सर्व प्रकार गाड्या तयार करुन डिलेव्हरीपूर्वी जेथे पार्क करण्यात येतात तिथेच घडल्याने विक्रीसाठी तयार असणाऱ्या गाड्यांनाच नुकसान झालं आहे. (सर्व फोटो : Twitter/DaniAlvarezEiTB)

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”