-
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शहरांमध्ये छोट्या कालावधींसाठी लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले असून, राज्यातही लॉकडाउन होण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२१ फेब्रुवारी) जनतेशी साधलेल्या संवादातून लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना आणि लॉकडाउन संदर्भात काय म्हणाले? काही ठळक मुद्दे… (संग्रहित छायाचित्रं/सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डल)
-
"बरेच दिवस आपल्याला भेटलो नाही. आज आपल्या भेटीला येण्याचं कारण कळलं असेलच. करोनाव्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनात होतंच. करोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला त्याला जवळपास वर्ष होत आलं. तेव्हा मी आपल्याशी संवाद साधत होतो. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हा समाधानाचा क्षण होता."
-
"करोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी, याची कोणालाच कल्पना नव्हती. औषध तेव्हा ही नव्हतं आजही नाहीये. एक दिलासादायक बातमी म्हणजे आता वॅक्सीन आलंय. व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ९ लाख फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात केलीये."
-
(संग्रहित छायाचित्र)
-
(संग्रहित छायाचित्र)
-
"लस घेण्यापूर्वी व नंतरही आपण मास्क घालायला हवा. हे एक युद्धच आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. अजून आपल्या हातात तलवार नाही. व्हॅक्सिन धीम्या गतीने येतयं. पण मास्क हीच ढाल आहे. ही ढाल काढली किंवा घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आहेच. काही वेळेला तो आप्तस्वकीयांच्या माध्यमातून वार करतो." (संग्रहित छायाचित्रं/सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डल)
-
"आपल्याला विनंती आहे, की मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेण्याआधी व नंतरही. लग्न-समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आहेत. हॉटेल्स, दुकानं, रेस्तराँच्या वेळा वाढवल्या, लोकल्स सुरू केल्या, मंदिरं उघडली. त्या काळात आपण सूचनांचं तंतोतंत पालन केलं.आताही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे."
-
"आता झालं काय तर करोना गेला असं वाटायला लागलं. पाश्चिमात्य देशांत असंच झालं. सुरुवातीलाच सांगितलं, की लाट येते, मग खाली जाते, परत वर येते. ती खाली जाते तेव्हाच थांबवायचं. आपण अलीकडे जी शिथिलता अनुभवली ती पाश्चिमात्य देशांतही होती. पण तिकडे अनेक देशांत लॉकडाऊन करावा लागला."
-
"कोणी काहीही म्हणो. संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर संपर्क तोडणे हाच माहीत असलेला मोठा उपाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी करोना गया, कुछ नही अभी असं वातावरण होतं. तेव्हा दोन-अडीच हजार रुग्ण येत होते. खरंच चांगलं वातावरण होतं. पण ते सगळं तुमचं कर्तृत्व होतं आणि योद्ध्यांची अविरत मेहनत."
-
"कोविड योद्ध्यांनी अहोरात्र काम केलं. कित्येकांनी जीवही गमावले. त्यांनी जे बलिदान केलं, जे शहीद झाले त्यांच्या मेहनतीवर आपण पाणी टाकायला नको. कोविड योद्ध्यांचा सगळीकडे सत्कार सुरू आहे. आनंद आहे. पण सत्कार करताना किमान एक भावना अशी हवी की आणखी कोविड योद्धे निर्माण करण्याची गरज लागायला नको."
-
"आपण कोविड योद्धे नाही झालात, तरी कृपा करून दूत होऊ नका. एकीकडे कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा ते उघडा म्हणायचं, असं नको. सामाजिक भान ठेवा. हे युद्ध जिंकण्यासाठी आपण जे करता येईल ते करायला हवं." (संग्रहित छायाचित्रं/सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डल)
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)
-
"आधी रुग्ण आणि आरोग्य सुविधांचं प्रमाण विषम होतं. पण तेव्हाचा जो पिक होता, जे सर्वोच्च शिखर होतं, तिथपासून आता सुरुवात झाली तर आरोग्यव्यवस्थेवर किती ताण येईल. मंत्रिमंडळातले आमचे सहकारीही बाधित होत आहेत. राजेश टोपे जी, जयंत पाटील जी बाधित आहेत. सुदैवाने यशोमती ताई निगेटिव्ह आल्या."
-
"दोन अडीच हजारांवरून आज महाराष्ट्रात ६९७१ रुग्णसंख्या झाली आहे. मुंबईत जी संख्या ४०० च्या आसपास होती, ती आता ८००-९०० वर गेली आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती म्हणजे तर दुसरी लाट आली आहे का? ती दारावर धडका मारतेय. आली की नाही हे पंधरा दिवसांत कळेल."
-
"उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं- गर्दी होणारी आणि मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांची बंदी घातली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी."
-
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली, तेव्हा आपण घरात होतात. आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर ते अवघड आहे. आता सगळे घराबाहेर आहेत. अशा वेळेस मग या यंत्रणेवर किती ताण द्यायचा. एकाच यंत्रणेवर ताण टाकून आपण बेभान वागायचं हा अमानुषपणा आहे." (संग्रहित छायाचित्रं/सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डल)
-
"मला असं वाटतं, की माझे कुटुंब जशी मोहीम राबवली आणि यशस्वी केली, तशी आता नवी मोहीम सुरू करायला हवी. मी जबाबदार. प्रत्येकानं मास्क घालायचा, हात धुवायचे, सगळे सॅनिटाययझर विसरायला लागले आहेत. ते वापरायचं, अंतर ठेवायचं."
-
"लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर आठ दिवसांत मिळेल. आठ दिवस मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको, ते मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं अशा गोष्टी पाळतील. बघूया किती जणांना लॉकडऊन हवा आणि किती जणांना नको आहे ते." (संग्रहित छायाचित्रं/सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डल)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार