-
वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. (सर्व फोटो युट्यूब व्हिडीओवरुन स्क्रीशॉर्ट आणि रॉयटर्स, पीटीआयवरुन साभार)
-
मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात भाजपा समर्थक आणि विरोधक दोघांकडूनही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. त्यातच यापूर्वी मोदींना अशाप्रकारे कधी रडू आलं होतं यासंदर्भातही माहिती शोधली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत की पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी कधी आणि कोणत्या कार्यक्रमामध्ये भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे.
-
२० मे २०१४ रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये > पहिल्यांना लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण दिलं होतं. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याने ते भाषण देता देताच थांबलेले.
-
"अडवाणींनी एक शब्द वापरला. मी त्यांना सांगू इच्छितो की तो शब्द त्यांनी वापरु नये. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की नरेंद्रभाईंनी कृपा केली," असं म्हणताच मोदी गहीवरले.
-
मोदींनी थांबून पाणी प्यायलं आणि त्यानंतर, "आईची सेवा ही कधी कृपा नसते. तशी भारतमाता माझी आई आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीसुद्धा माझी आईच आहे," असं मोदी म्हणाले होते.
-
२७ सप्टेंबर २०१५ रोजी अमेरिकेत फेसबुकच्या कार्यक्रमात > फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गसोबत संवाद साधतानाही मोदींना रडू आलं होतं. टाऊन हॉल सेशनमधील कार्यक्रमामध्ये मोदींचा कंठ दाटून आला होता.
-
"मी सव्वाशे कोटी भारतांना नमन करतो, की ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला स्वीकारलं. मी खूप सामान्य कुटुंबातून आलोय. माझे वडील तर सध्या हयात नाहीत. माझ्या आईचं वयही जास्त आहे. मात्र आजही ती स्वत:चं काम स्वत: करते. शिकलेली नाहीय पण बातम्या आणि टीव्हीवरुन जगात काय सुरु आहे हे तिला ठाऊक असतं," असं मोदींनी आपल्या आईबद्दल बोलताना या मुलाखतीमध्ये सांगितलं.
-
आईने आपल्याला लहानाचं मोठं करताना किती कष्ट घेतले हे सांगताना मोदींचा कंठ दाटून आला. "आम्हाला लहानचं मोठं करण्यासाठी तिने आजूबाजूंच्याच्या घरात भांडी धुणे, पाणी भरणे, मजुरी करणे अशी कामं केली. एक आई आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी किती कष्ट केले याची तुम्ही कल्पना करु शकता," असं मोदी म्हणाले.
-
फेसबुकच्या कार्यक्रमातच पुढे बोलताना, "हे केवळ नरेंद्र मोदींबद्दल घडलं आहे असं नाही तर भारतात अशा लाखो माता आहेत ज्यांनी आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आपलं पुर्ण आयुष्य दिलं आहे. म्हणून मी सर्व मातांना नमन करतो. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आणि आशिर्वाद आम्हाला पुढील वाटचालीसाठी शक्ती देवोत तसेच आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची दिशा देतात. हीच आईची सर्वात मोठी ताकद असते. तुम्ही कधीच काही बना असं आई सांगत नाही पण तुम्ही तिथपर्यंत कसे पोहचाल यासाठी ती झटत असते. त्यामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात आईचा खूप मोठा वाटा असतो," असंही मोदी म्हणाले.
-
२२ जानेवारी २०१६ रोजी लखनऊ विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात > देशभरात खळबळ माजवणाऱ्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणासंदर्भात बोलताना मोदी २२ जानेवारी २०१६ रोजी भाषण देताना रडले होते. लखनऊ विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभामध्ये मोदी बोलत होते.
-
माझ्या देशातील तरुण वयाच्या रोहितवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची बातमी समजते तेव्हा त्याच्या कुटुंबियांचं काय झालं असेल असा विचार मनात येतो. भारताने आपला एक मुलगा गमावला, असं मोदी म्हणाले होते.
-
रोहितच्या आत्महत्येचं कारण काहीही असेल, त्यामागील राजकारणही चर्चेत असेल पण खरं हे आहे की एका आईने आपला पुत्र गमावला, मला यामुळे होणाऱ्या वेदना चांगल्याप्रकारे समजू शकतात, असं मोदींनी म्हटलं होतं.
-
१३ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीनंतर गोव्यातील कार्यक्रमात > भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर पाचच दिवसांनी गोव्यातील एका कार्यक्रमात देशातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना मोदींचा कंठ दाटून आलेला.
-
इतर राजकीय पक्षांप्रमाणे मी सुद्धा येईल आणि निघून जाईल असं तुम्हाला वाटलं असेल तर एक सांगू इच्छितो की मी खुर्चीच्या मोहासाठी जन्माला आलेलो नाही, असं मोदींनी या भाषणामध्ये म्हटलं होतं. विरोधकांना त्यांनी हा टोला लगावला होता.
-
मी माझं घरं, कुटुंब आणि सर्वकाही देशासाठी सोडलं आहे, हे भाषणातील वाक्य म्हणताना मोदींचा कंठ दाटून आला.
-
९ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यसभेत गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना > काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आल्याने या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता.
-
गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
-
“जेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं सांगत असताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.
-
२१ मे २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन करोनाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीतील डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना रडू आलं.
-
वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला.
-
देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. याचवेळेस करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना रडू आलं. त्यांनी हात जोडून अभिवादनही केलं.
-
मोदींच्या या रडण्यामुळे सोशल मीडियावर अनेक मतप्रवाहं असणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. भाजपा समर्थक मोदींची भावनिक बाजू समजून घेण्याची गरज असल्याचं सांगत असतानाच दुसरीकडे विरोधक मात्र हे नाटक असल्याची टीका करत आहेत.

Maharashtra Breaking News Live Updates: मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? – निशिकांत दुबे