अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्‍यामुळे दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्‍याचा रमेश बुंदिले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्‍का मानला जात असताना महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या समोरील अडचणी वाढल्‍या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशादरम्यान आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघ हा युवा स्वाभिमान पक्षाला द्यावा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली होती. मात्र महायुतीची उमेदवारी मिळवणारे अभिजीत अडसूळ हे रवी राणा यांचे कट्टर विरोधक मानले जातात. अडसूळ यांना उमेदवारी मिळताच युवा स्वाभिमानी पक्ष हा दर्यापूर मतदारसंघातून रमेश बुंदिले यांना उमेदवारी देणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा : Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?

अभिजीत अडसूळ हे बाहेरचे पार्सल असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा या लोकसभेच्‍या निवडणुकीत रिंगणात असताना अभिजीत अडसूळ यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे ते म्हणाले. भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी देखील अभिजीत अडसूळ यांच्‍या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. दर्यापूर आणि मेळघाटची जागा भाजपला मिळेल, असा दावा त्‍यांनी केला होता.

रमेश बुंदिले यांनी आता युवा स्‍वाभिमान पक्षात प्रवेश केल्‍याने अडसूळ-राणा वाद पुन्‍हा एकदा उफाळून येण्‍याची शक्‍यता आहे. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना २०१९ च्‍या निवडणुकीत पराभूत केले होते. २०१४ पासून राणा दाम्‍पत्‍य तसेच अडसूळ पिता-पुत्र यांच्‍या दरम्‍यान संघर्ष सुरू आहे. अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्‍याचा आरोप करून न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणात नवनीत राणा यांना दिलासा दिला खरा, पण तरीही अडसूळ यांनी विरोध कायम ठेवला होता. लोकसभा निवडणुकीतही अडसूळ यांनी संघर्षाचीच भूमिका घेतली होती. आता हा विरोध कुठल्‍या वळणावर पोहचणार, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.

हेही वाचा : झारखंड विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपाच्या १२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पक्षावर घराणेशाहीचा आरोप

आपण नागरिकांच्‍या सातत्‍याने संपर्कात असून मतदारसंघाच्‍या विकासाचा आपले व्‍हीजन स्‍पष्‍ट आहे. जनतेच्‍या पाठिंब्‍यावरच आपण निवडून येणार आहोत. आपण कुणाच्‍याही विरोधाची चिंता करीत नाही. यासंदर्भात वरिष्‍ठ नेते योग्‍य तो निर्णय घेतील, असे अभिजीत अडसूळ यांचे म्‍हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daryapur assembly constituency bjp leader ramesh bundile joined yuva swabhiman paksh print politics news css